आर. के. स्पोर्ट्स अकॅडमीचे तब्बल १२३ खेळाडू देशसेवेत रुजू
सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ
सांगली:- येथील विलिंग्डन महाविद्यालय परिसरात साधारण २०१४ साली अवघ्या २७ खेळाडूंना घेऊन सुरू झालेली आर. के. स्पोर्ट्स अकॅडमी, सध्या संस्थापक अध्यक्ष राहुल कांबळे हे त्यांचे मोठे बंधू रवींद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण ४०० विद्यार्थ्यांना पोलीस, आर्मी व एन. डी. ए. भरतीचा सराव देत आहेत. २०२३ या वर्षी अकॅडमीचे तब्बल १२३ खेळाडू देशसेवेत रुजू झाले आहेत. अवघ्या ९ वर्षात महाराष्ट्रभर ख्याती झालेल्या आर. के. स्पोर्ट्स अकॅडमीला सध्या पश्चिम महाराष्ट्राबरोबर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र येथुन खेळाडूंची पसंती मिळत आहे.
कांबळे हे अत्यंत सामान्य कुटुंबातील असून खेळाचा वारसा असणार हे कुटुंब अगदी जिद्दीने व नेटाने आज समाजासाठी आदर्श म्हणून उभे झाले आहे. प्रामाणिक कष्ट व जिद्द असेल तर काय घडू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कांबळे कुटुंब. राहुल यांचे वडील मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. राहुल हे अगदी लहान असताना पित्याचे छत्र हरपले. नवरा गेल्याचे दुःख पचवून आई जानकी हिने आपल्या एक मुलगी व दोन मुले आशा तीन आपत्यांचा मोठया हिमतीने व कष्टाने सांभाळ केला. लहानपणापासूनच कांबळे बंधूंना खेळाची आवड होती. खेळाबरोबरच वर्दीचे वेड होतेच. पण दोघांची उंची कमी असल्याने भरती होता आले नाही. पण रवींद्र याने हिम्मत न हरता खेळासोबत अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवली व लहान बंधू राहुल याला इतरांचे वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर. के. स्पोर्ट्स अकॅडमीची सुरवात करून दिली. दोघांनाही राष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव असल्याने खेळाडूंसाठी आवश्यक असणाऱ्या बारीक सारीक गोष्टीची कल्पना व अनुभव असल्याने त्यांच्या तालमीतील खेळाडू देशसेवेत चमकू लागले आहेत. सध्या आर. के. स्पोर्ट्स व देशसेवा हे समीकरण झाले आहे. यांच्या अकॅडमी मध्ये येणारा खेळाडू देशसेवेचे स्वप्न घेऊन येतो व त्याच्या स्वप्नांना आकार देण्याचे काम हे कांबळे बंधू करत आहेत. त्यांनी आजवर शेकडो खेळाडूंना पोलीस, आर्मी, एन डी ए भरतीसाठी मार्गदर्शन केले आहे.
२०२३ साली झालेल्या भरतीमध्ये १२३ खेळाडूंची निवड करत एक मोठी मजल मारली आहे. त्यांच्या सत्कार समारंभ सोहळा नुकताच वारणाली पाटबंधारे कार्यालय विश्रामबाग येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी आयुक्त सुनील पवार, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू माने, मनोज दादा सरगर तसेच पैलवान चंद्राहार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश जाधव व गणेश सिंहासने यांनी केले. या कार्यक्रमाचे स्वागत उत्सुक नवनाथ पांढरे, संदीप डांगे, रविंद्र कांबळे, प्रयाग पाटील, गणेश आदमने, नितीन गडदे, दत्ता सदामते, अमय भावे, प्रसाद कांबळे, जावेद काजी हे होते. या कार्यक्रमावेळी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या हस्ते आर् के स्पोर्ट्स चे संस्थापक अध्यक्ष राहुल कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. २०१४ पासून आर के स्पोर्ट्स मध्ये आत्तापर्यंत सातशे विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रांमध्ये निवड झाली आहे. विद्यार्थ्यांमधून महेश माळी यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. तसेच रवींद्र कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी आजी माजी खेळाडू पालक व इतर मान्यवर उपस्थित होते.