ईडीकडून महेश बाबूला समन्स; रिअल इस्टेट घोटाळ्याशी संबंधित चौकशी सुरू

मुंबई : दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स पाठवले आहे. हैदराबादमधील दोन रिअल इस्टेट कंपन्यांशी संबंधित कथित आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना 28 एप्रिलपर्यंत ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
ईडीच्या प्राथमिक तपासानुसार, महेश बाबूने ‘साई सूर्या डेव्हलपर्स’ आणि ‘सुराणा ग्रुप’ या कंपन्यांच्या एंडॉर्समेंटसाठी 5.9 कोटी रुपये घेतले होते. यातील 3.4 कोटी रुपये चेकने आणि उर्वरित 2.5 कोटी रुपये रोख स्वरूपात देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ईडी अधिकाऱ्यांचा संशय आहे की, रोख रक्कम ही फसवणुकीतून आलेल्या पैशांचा भाग असू शकते.
या दोन्ही रिअल इस्टेट कंपन्यांनी एकाच जमिनीची अनेक वेळा विक्री, अनधिकृत लेआउट, आणि चुकीच्या नोंदण्या करून खरेदीदारांकडून कोट्यवधी रुपये आगाऊ वसूल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात भाग्यनगर प्रॉपर्टीज लिमिटेडचे संचालक नरेंद्र सुराणा, तसेच साई सूर्या डेव्हलपर्सचे मालक के. सतीश चंद्र गुप्ता यांच्यावर तेलंगणा पोलिसांकडे एफआयआर दाखल आहे.
ईडीने १६ एप्रिल रोजी सिकंदराबाद, जुबली हिल्स आणि बोवेनपल्ली येथे छापे टाकले होते, ज्यामध्ये कागदपत्रे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
ईडी महेश बाबूचा या घोटाळ्यात थेट सहभाग आहे का, याची चौकशी करत आहे. अद्याप त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.