भारत-पाकिस्तान तणावाचा बाजारावर परिणाम; गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटींचे नुकसान

भारत-पाकिस्तान तणावाचा बाजारावर परिणाम; गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटींचे नुकसान

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दिवसेंदिवस तणावपूर्ण होत चालले आहेत. पहलगाममध्ये पर्यटकांची निर्घृण हत्या झाल्यानंतर भारताने पाकिस्तान व PoKमधील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानने विविध सीमा रेषांवर गोळीबार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या तणावाचा परिणाम शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. गेल्या दोन व्यापार सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजारात अस्थिरता वाढली असून गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला आहे.

तणावामुळे मोठी विक्री

शुक्रवारी NSE निफ्टी 265.80 अंकांनी घसरून 24,008 वर बंद झाला. त्याच वेळी BSE सेन्सेक्स 880.24 अंकांनी किंवा 1.10% ने घसरून 79,454.47 वर बंद झाला. मागील दोन सत्रांत सेन्सेक्स 1,292.31 अंकांनी घसरला आहे. परिणामी BSE सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 7,09,783 कोटी रुपयांनी घटून 4,14,40,850 कोटी रुपये (यूएस $4.86 ट्रिलियन) झाले आहे.

गुरुवारपासून वादात वाढ

गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू, पठाणकोटसह लष्करी ठिकाणांवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. यामुळे तणाव अधिकच वाढला. मेहता इक्विटीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत तपासे म्हणाले, “भारत-पाक संघर्षामुळे गुंतवणूकदार स्थानिक इक्विटीजपासून दूर राहत आहेत.”

कोणत्या शेअर्सना झळ, कोणाला फायदा?

सेन्सेक्समधील ICICI बँक, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, HDFC बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह आणि अदानी पोर्ट्स यांना सर्वाधिक नुकसान झाले. दुसरीकडे टायटन कंपनी, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे शेअर्स वधारले.

कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक घसरण?

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये रिअल्टी निर्देशांकात 2.08% घसरण झाली. त्यानंतर युटिलिटी, वित्तीय सेवा, वीज, बँका, एफएमसीजी आणि सेवांमध्ये घसरण झाली. याउलट भांडवली वस्तू, औद्योगिक, ग्राहक वस्तू आणि धातू क्षेत्रात वाढ दिसली.

या अस्थिरतेतही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) गुरुवारी निव्वळ खरेदीदार राहिले. मात्र किरकोळ गुंतवणूकदार अधिक सावध राहिले.