एस. एम. जोशी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची नृत्य स्पर्धेसाठी परदेशात निवड
दिनेश पवार / दौंड, प्रतिनिधी :
रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजच्या विद्यार्थीनींनी सादर केलेले आणि सलग तीनवेळा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले, 'चिरमी' या राजस्थानी लोकनृत्याची सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अखिल लोककला सांस्कृतिक संस्था पुणे आयोजित 'युनिव्हर्सल हार्मोनी -2023' या राष्ट्रीय स्तरावरील नृत्य, संगीत व वाद्य स्पर्धेमध्येही एस.एम.जोशी कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या 'चिरमी' या राजस्थानी लोकनृत्याला सलग तिसऱ्यांदा प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. यामध्ये शिवानी शेंडकर, दिलशाद मुलानी आणि वैष्णवी क्षिरसागर या विद्यार्थिनींची सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाविद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या या विद्यार्थीनींचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, पंढरपूरचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
विद्यार्थिनींना विविध स्पर्धेसाठी तयार करण्यामध्ये महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिल्पा शितोळे,स्टुडन्ट वेल्फेअर कमिटीचे प्रमुख डॉ. अतुल चौरे आणि नृत्य विभाग प्रमुख डॉ. नम्रता कदम यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे, डॉ. संजय जगताप, प्रा. संजय जडे आणि महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.