महापालिकेतील विविध प्रश्नांसाठी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने अतिरिक्त आयुक्तांना निवेदन
रोहन भिऊंगडे / प्रतिनिधी :
कोल्हापूर महापालिकेतील विविध प्रश्नांवर आज भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विराज चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे यांना निवेदन देण्यात आले.
यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा केला जात आहे. याला पर्याय म्हणून सर्वसामान्य लोकांना घराजवळील किंवा परिसरातील असलेले हँड पंप अर्थात बोरिंग खूप दिलासादायक ठरत आहेत. पण काही ठिकाणी महानगरपालिकेचे बोरिंग नादुरुस्त असल्यामुळे लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याकडे वैयक्तिक लक्ष घालून जल अभियंत्यांना सूचना कराव्यात आणि कोल्हापुरात बंद असलेले बोरिंग पुन्हा सुरु करून सर्वसामान्य नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी विराज चिखलीकर यांनी केली.
महापालिकेतील ३५१ हंगामी कामगार आणि २५४ ठोक मानधनावरील कामगार तसेच पवडी, उद्यान, आरोग्य (स्वच्छता), पाणीपुरवठा या सारख्या अनेक विभागात मनुष्यबळांची कमतरता भासत असल्याने नवीन नोकरी भरतीबाबत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांच्याकडे विचारणा केली. यावेळी त्यांनी 182 विविध पदांच्या भरतीचे प्रस्ताव करण्याचे काम सुरू असून लवकरच कारवाई पूर्ण करून जाहिरात काढू असे आश्वासन दिले. कोल्हापुरातील नंगीवली चौक ते मिरजकर तिकटीपर्यंतच्या रस्त्यामध्ये ड्रेनेजलाईन आणि पिण्याच्या पाईपलाईनचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. यावर ठेकेदारांना केलेले पॅचवर्क पावसाने धुऊन गेल्यामुळे तेथे पुन्हा एकदा पॅचवर्क करण्याची आवश्यकता आहे, अशी विश्वजीत पवार यांनी सूचना केली.
घरातील कचरा उठावासाठी असलेले टिप्पर गाड्या बहुसंख्य बंद अवस्थेत असल्याने कचरा उठाव होत नाही याकडेही लक्ष द्यावे असे ओंकार गोसावी यांनी सांगितले. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. जर हा पाऊस असाच पडत राहिला तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या मदतीला भारतीय जनता युवा मोर्चाची टीम तयार असल्याचे युवराज शिंदे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य विराज चिखलीकर, उपाध्यक्ष सुनील पाटील, विश्वजीत पवार, ओंकार गोसावी, युवराज शिंदे, अमित संकपाळ, अनिकेत अतिग्रे, अमेय भालकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.