मल्याळम भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक एमटी वासुदेवन नायर यांचे निधन

मुंबई: मल्याळम भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त एमटी वासुदेवन नायर यांचे बुधवारी केरळमधील कोझिकोड येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९१ वर्षे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देखील शोक व्यक्त केला. याशिवाय राज्य दोन दिवसांचा सरकारी दुखवटा जाहीर केला आहे. त्यांनी लिहिले की, 'एमटी वासुदेवन नायर यांच्या निधनाने आपण मल्याळम साहित्याचा एक दिग्गज गमावला आहे, ज्यांनी आपल्या भाषेला जागतिक उंचीवर नेले.'
एमटी वासुदेवन नायर केरळमधून प्रसिद्ध होणाऱ्या 'मातृभूमी'चे संपादक होते. त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. ते चित्रपट क्षेत्रातही कार्यरत होते. त्यांनी ५४ चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या पैकी चार पटकथा लेखनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी सात चित्रपटांचे दिग्दर्शन केले. २०१३ मध्ये त्यांना मल्याळम सिनेमातील कामगिरीबद्दल जे.सी. डॅनियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२२ मध्ये त्यांना केरळ सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच केरळ ज्योती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.