कृषी सहायकांचे विविध मागण्यांसाठी करवीर कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

कृषी सहायकांचे विविध मागण्यांसाठी करवीर कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बहिरेश्वर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांनी आंदोलन सूरू केले आहे. राज्य व केंद्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय कृषी योजनांचे काम कृषी सहाय्यकामार्फतच केले जाते. हे काम करत असताना अनेक समस्या उद्भवतात म्हणून वेळोवेळी विविध मागण्या शासन स्तरावर करण्यात येतात यामध्ये कृषी सहाय्यकांना लॅपटाॅप पुरविणे, ग्रामस्तरावर ग्रामविकास अधिकारी व सहाय्य्क महसूल अधिकारी यांच्या सारखा कृषी मदतनीस नेमणे,कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलुन सहाय्यक कृषी अधिकारी पदनाम करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

या कृषी सहायकांच्या प्रलंबीत मागण्यांकडे राज्य शासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे म्हणून नाईलाजास्तव  5 मे पासून दररोज वेगवेगळ्या भूमिकेतून आंदोलन करण्याचा निर्णय कृषी सहायक संघटनेने घेतला आहे. यासाठी 5 मे रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले तर 6 मे रोजी राज्य शासनाच्या शासकीय कार्यालय व्हाट्सअप ग्रुप मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला. आज तालुका कृषी अधिकारी करवीर कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले.  आमच्या मागण्यांचा लवकरात लवकर निपटारा करावा अन्यथा 15 मे पासून संपूर्ण काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. 

यावेळी कोल्हापूर जिल्हा कृषी सहायक संघटना उपाध्यक्ष मोहन पाटील, करवीर तालुका कृषी सहायक संघटना अध्यक्ष अमोल टिपुगडे, उपाध्यक्षा प्रियांका पाटील, कृषी सहायक संजय चौगले, धनाजी माने, संतोष मोरे, तानाजी पाटील, संजय पोवार, शुभांगी देसाई, गीता कांबळे व आदी कृषी सहायक उपस्थित होते.