कोजिमाशि पतसंस्थेचा आर्थिक प्रगतीचा नवा शिखर ; विक्रमी ५ कोटींचा निव्वळ नफा

कोजिमाशि पतसंस्थेचा आर्थिक प्रगतीचा नवा शिखर ;  विक्रमी ५ कोटींचा निव्वळ नफा

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्था (कोजिमाशि) ने आर्थिक वर्ष २०२४ - २५ मध्ये विक्रमी ५ कोटी ११ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाराम शिंदे आणि तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी दिली. संस्थेकडे सध्या ६२० कोटी रुपयांच्या ठेवी असून, ५०२ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. यावर्षी संस्थेची वार्षिक उलाढाल तब्बल २३०२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी तिच्या आर्थिक स्थैर्याची स्पष्ट साक्ष देणारी आहे.

संस्थेच्या यशामागे सभासदांचा विश्वास आणि पारदर्शक कारभार हेच मुख्य घटक असल्याचे अध्यक्ष शिंदे यांनी नमूद केले. “२१ वर्षांपूर्वी सभासदांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आज बळकट झाला असून, संस्था गरुडभरारी घेत आहे,” असे ते म्हणाले.

सध्या संस्थेच्या १५ शाखा कार्यरत असून, ९५०० सभासदांपर्यंत सेवा पोहोचवली जात आहे. केवळ आर्थिक लाभ न देता, कोजिमाशि विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. यामध्ये –

- कन्यादान साडी योजना

- सुकन्या ठेव भेट योजना

- गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

- जागतिक महिला दिन ठेव योजना

- विशेष म्हणजे मयत सभासदांचे कर्जमाफी योजना

यंदा या कर्जमाफी योजनेतून १७ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली असून, ही योजना राज्यातील इतर वित्तीय संस्थांसाठी आदर्शवत ठरत असल्याचे दादासाहेब लाड यांनी सांगितले.  संस्थेचे उपाध्यक्ष शरद तावदारे यांनीही यशाचे श्रेय सभासद, कर्मचारी आणि व्यवस्थापनाच्या एकजुटीला दिले. कोजिमाशि संस्थेने केवळ आर्थिक वाढ नाही तर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थेचा आदर्श ठेवला आहे.