कोरोनापेक्षाही भयंकर GBS ? महाराष्ट्र चिंतेत...

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : GBS म्हणजेच गुलियन बॅरे सिंड्रोमचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाप्रमाणेच हा GBS व्हायरस आता लोकांसाठी जीवघेणा ठरत आहे. महाराष्ट्रात झपाट्याने नवीन रुग्ण आढळत असून या आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.या वाढत्या आजारामुळे महाराष्ट्र चिंतेत पडला आहे.
GBS व्हायरसने घेतले आणखी दोन बळी
महाराष्ट्रात शुक्रवारी GBS व्हायरसने आणखी दोन बळी घेतले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये गुलियन बॅरे सिंड्रोममुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यातही याच व्हायरसने आणखी एकाचा बळी गेला आहे. पिंपरी-चिंचवडमधील मृताचे वय 36 वर्षे होते. अशा प्रकारे, महाराष्ट्रात आतापर्यंत या GBS व्हायरसमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात GBS व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आतापर्यंत पुण्यात GBS व्हायरसचे 130 रुग्ण आढळून आले आहेत.
या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विशेषतः हात स्वच्छ धुणे, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणे यासारख्या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून रॅपिड रिस्पॉन्स टीमची स्थापना
24 जानेवारी रोजी, राज्य आरोग्य विभागाने रॅपिड रिस्पॉन्स टीम स्थापन केली, जेणेकरून संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये अचानक झालेल्या वाढीची चौकशी करता येईल. सुरुवातीलाच संसर्गाची 24 संशयित प्रकरणे समोर आली होती. दरम्यान, RRT आणि PMC च्या आरोग्य विभागाने सिंहगड रोड परिसरातील बाधित भागात देखरेख सुरू ठेवली आहे.
GBS हा एक गंभीर आजार असून नागरिकांनी या आजाराबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.