धक्कादायक | नात्याला काळीमा फासणारी घटना, वडिलांनीच केला तीन मुलींवर अत्याचार

नालासोपारा : मुंबईपासून काही अंतरावर असणाऱ्या नालासोपाऱ्यात धक्कादायक अशी नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वडिलांनीच पोटच्या तीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तिन्ही मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
मुलीचा पिता खंडणी, गोळीबार तसेच हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. बुधवारी नालासोपारा पोलिसांनी मुलींचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीचा शोध नालासोपारा पोलीस घेत आहेत. पीडित मुली या सख्ख्या बहिणी आहेत. त्या मूळच्या कोकणातील राहणार्या आहेत. मुलींचा 56 वर्षीय पिता कुख्यात गुन्हेगार आहे. त्याला एकूण 5 मुली आहेत. कोकणातील गावी असताना तो या मुलींवर बळजबरी करून बलात्कार करत होता. यापैकी एका मुलीचा चार वेळा गर्भपातही करण्यात आला होता, अखेर पित्याच्या अत्याचाराला कंटाळून आई पाचही मुलींना घेऊन नालासोपारा येथे एका नातेवाईकाच्या आश्रयाला आली.
आरोपीविरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
या तीन मुलींपैकी मोठी मुलगी 21 वर्षांची असून अन्य दोन मुली या अल्पवयीन आहेत. वडिलांकडून होत असलेल्या अत्याराचाविरोधात (Sexual Assault) तक्रार करण्याचा निर्णय त्यांनी हिंमतीने घेतला. मोठ्या मुलीने याबाबतची फिर्याद दिली आहे. आतापर्यंत वडिलांच्या दहशतीमुळे गप्प बसल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले. मुलींच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नात्याला काळीमा फासणार्या या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.