'गोकुळ' मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) 'जागतिक योग दिन' अत्यंत उत्साहात व सकारात्मक वातावरणात संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयातील प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योग शिक्षक अशोक पालकर यांनी योगाचे महत्व पटवून देवून प्रात्यक्षिके करुन दाखवलीत. यावेळी गोकुळचे संचालक, विभागप्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर कुशल योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम, विविध योगासने, ध्यानधारणा इ. क्रियांचा सराव करण्यात आला. सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनापासून सहभाग नोंदवत सकारात्मक ऊर्जा आणि ताजेपणाचा अनुभव घेतला.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर समतोल आहे. निरोगी शरीर, शांत आणि सकारात्मक मन, तसेच चांगली कामगिरी यासाठी दररोज योग सराव करणे गरजेचे आहे. गोकुळमधील प्रत्येक कर्मचारी, अधिकारी आणि सभासदांनी हा संकल्प करायला हवा. कारण कर्मचारी जर तंदुरुस्त आणि आनंदी असतील तर त्यांच्या कामातून गोकुळ संघाची उत्पादनक्षमता, कार्यक्षमता आणि संपूर्ण कार्यसंस्कृती बळकट होईल.
या कार्यक्रमात मार्गदर्शक करताना ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, योगामुळे मन:शांती मिळते, कार्यक्षमतेत वाढ होते व व्यावसायिक दडपणातून मुक्तता मिळते. गोकुळ संघाच्या प्रत्येक स्तरावर आरोग्यप्रेमी संस्कृती रुजवण्यासाठी असे उपक्रम दरवर्षी घेतले जातील. कार्यक्रमाचे सूञसंचालन श्री.एम.पी.पाटील यांनी केले. आभार डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी यांनी मांडले.
यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बाळासो खाडे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, जगदीश पाटील, हणमंत पाटील, योग शिक्षक डॉ. विलासराव देशमुख, मारुती शिंदे, बाजीराव पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.