परिवहन संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - मागील काही दिवसांपासून परिवहन संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण बाबतचे कामकाज हे वेग नियंत्रक तपशील अद्ययावत नसल्यामुळे प्रलंबित होते. मात्र, परिवहन आयुक्त कार्यालयाकडून याबाबत नव्याने कार्यपध्दती निश्चित करून आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे परिवहन संवर्गातील वाहनांचे कामकाज पुर्ण करुन घेण्याकरीता वाहनधारकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा व विहीत कालावधीत कामकाज पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांन केले आहे.
परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांचेकडून परिवहन संवर्गातील वाहनांना बसविण्यात आलेल्या वेग नियंत्रकाचा 16 अंकी UIN क्रमांक अद्ययावत करण्याबावत सुधारीत सूचना या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत सदर सुचनांची माहिती परिवहन संवर्गातील वाहनधारंकाना होणे आवश्यक असून त्या खालीलप्रमाणे आहेत.
- परिवहन आयुक्त कार्यालयाकडून परिवहन संवर्गातील वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी अर्ज करताना वाहन प्रणालीमध्ये वेग नियंत्रकाचा 16 अंकी UIN अपडेट असण्याबाबत लावण्यात आलेला चेक काढण्यात आलेला आहे.
- सन 2018 नंतर परिवहन संवर्गातील वाहनांना बसविलेल्या वेग नियंत्रक उपकरणांचा MIS डाटा का राज्यातील सर्व प्रादेशिक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांना पुरविण्यात आलेला आहे. या डाटामध्ये वाहनांना बसविलेल्या वेग नियंत्रकांचा 16 अंकी UIN क्रमांकाची माहिती उपलब्ध आहे.
- त्यानुसार सर्व परिवहन कार्यालयांकडून वाहनांची तपासणी करताना वाहनामध्ये बसविलेले वेग नियंत्रक कार्यरत असल्याची खात्री करून सन 2018 पासून नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये बसविण्यात आलेला वेग नियंत्रकाचा 16 अंकी UIN क्रमांक अपडेट करण्यात येणार आहे.
तसेच परिवहन कार्यालयाकडून सन 2018 पुर्वी नोंदणी झालेल्या वाहनामध्ये बसविण्यात आलेल्या वेग नियंत्रक उपकरणावरील कोरलेला क्रमांक व्यक्तीशः तपासून वाहन प्रणालीमध्ये त्याप्रमाणे नोंद घेण्यात येणार आहे.