गौरी खानच्या 'तोरी' रेस्टॉरंटवर बनावट पनीरचा आरोप; इन्फ्लुएन्सरच्या चाचणीत खुलासा

मुंबई: बॉलिवूड बादशाह शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिचे मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंट 'तोरी' सध्या एका वादात अडकले आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या इन्फ्लुएन्सर आणि YouTuber सार्थक सचदेवा यांनी 'तोरी'मध्ये दिल्या गेलेल्या पनीरवर 'बनावट' असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
सार्थकने एक व्हिडिओ शेअर करत 'तोरी'मध्ये मिळालेल्या पनीरवर आयोडीन टिंचर टेस्ट केली. या चाचणीत चीजचा रंग काळा-निळा झाल्याचे दिसले, ज्यामुळे त्याने या पनीरमध्ये स्टार्च असल्याचा संशय व्यक्त केला. सार्थक म्हणाला, “शाहरुख खानच्या रेस्टॉरंटमधील पनीर बनावट असल्याचे मला जाणवले, आणि हे खूप धक्कादायक होतं.”
याच व्हिडिओत सार्थकने विराट कोहलीचा 'वन८ कम्यून', शिल्पा शेट्टीचा 'बास्टियन' आणि बॉबी देओलचा 'समप्लेस एल्स' अशा इतर सेलिब्रिटींच्या रेस्टॉरंट्समध्येही हीच चाचणी केली. त्या ठिकाणी पनीरवर रंग बदल झाला नाही, म्हणजेच तिथे स्टार्च नव्हता.
या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना 'तोरी' रेस्टॉरंटने स्पष्ट केले की, “आयोडीन टेस्ट फक्त स्टार्चची उपस्थिती दाखवते, पनीर खरे आहे की खोटे, हे सिद्ध करत नाही. आमच्या काही डिशमध्ये सोया-आधारित घटक वापरले जातात.”
या प्रकरणावर आरोग्यतज्ज्ञांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ग्रेटर नोएडामधील यथार्थ हॉस्पिटलमधील डॉ. किरण सोनी म्हणतात, “शुद्ध पनीर दुधापासून बनवले जाते आणि त्यात नैसर्गिकरित्या स्टार्च नसतो. मात्र, कधी कधी वजन वाढवण्यासाठी किंवा चवसाठी स्टार्च घातले जाऊ शकते. त्यामुळे आयोडीन टेस्टमध्ये रंग बदल झाल्यास ते पूर्णतः बनावट असल्याचे नाही, तर त्यात स्टार्च मिसळले असण्याची शक्यता असते.”