धर्मांतरामुळे चर्चेत 'फॅन्ड्री' अभिनेत्री राजेश्वरी खरात; चाहत्यांचा संताप

धर्मांतरामुळे चर्चेत 'फॅन्ड्री' अभिनेत्री राजेश्वरी खरात; चाहत्यांचा संताप

मुंबई :  कलाकारांचे जीवन त्यांच्या चाहत्यांवर खोल परिणाम करत असते. ते जे करतात, तेच अनेक चाहते देखील आपल्या आयुष्यात उतरवू पाहतात. त्यामुळेच हे कलाकार सोशल मीडियावर प्रचंड फॉलो केले जातात. अलीकडे एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अशीच एक चर्चेची लाट उसळली आहे.

‘फॅन्ड्री’ या नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण मात्र वेगळं आहे. राजेश्वरी सोशल मीडियावर नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते, पण यावेळी तिची पोस्ट पाहून अनेक चाहते नाराज झाले आहेत.

राजेश्वरीने अलीकडे एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती पाण्यात हात जोडून उभी आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने बाप्तिस्मा घेतल्याचं सांगितलं आहे. यासोबतच तिने काही ग्रुप फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती ख्रिश्चन समुदायातील व्यक्तींशी सोबत दिसते. या पोस्टमध्ये तिने लिहिले, “कारण तुमच्यासाठी माझ्या योजना मला माहित आहेत असे प्रभू म्हणतात…” आणि त्यासोबत बाप्तिस्मा, नवीनसुरुवात,आयुष्य, प्रेम, राजेश्वरीखरात, ईस्टर असे हॅशटॅग वापरले आहेत.

या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तिला बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ देत टीका केली आहे, तर काहींनी धर्मपरिवर्तनाच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. एकाने लिहिले, “बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेविरुद्ध लढा देऊन बौद्ध धर्म स्वीकारला, आणि तुम्ही तो सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला? शरम वाटली पाहिजे.” तर दुसऱ्याने लिहिले, “धर्मपरिवर्तन करणाऱ्यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले पाहिजे.”