पाणी टंचाई टाळण्यासाठी जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन आवश्यक : डॉ. अनिलराज जगदाळे

पाणी टंचाई टाळण्यासाठी  जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन आवश्यक : डॉ. अनिलराज जगदाळे

कोल्हापूर: आजवर जल व्यवस्थापनात अभियांत्रिकी दृष्टिकोनावरच अधिक भर दिला गेला आहे, ज्याचा उपयोग शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी होतो. मात्र हा दृष्टिकोन एकांगी असून, त्यामुळे कोल्हापुरासारख्या पाण्याने भरलेल्या जिल्ह्यात डिसेंबरनंतर पाणीटंचाई जाणवते. ही समस्या दूर करण्यासाठी जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. अनिलराज जगदाळे यांनी केले. 

कोल्हापूर पाटबंधारे मंडळातर्फे आयोजित जल व्यवस्थापन पंधरवड्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. अनिलराज जगदाळे यांनी जल व्यवस्थापनातील त्रुटींवर चिंता व्यक्त करत, पाणीसाठ्याचे संरक्षण करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात अधीक्षक अभियंता अभिजित म्हात्रे यांनी कर्मचाऱ्यांनी जल व्यवस्थापनासाठी झोकून देऊन काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी कृती आराखड्याचे नियोजन करून जल व्यवस्थापनाची अंमलबजावणी करण्यावर भर दिला.

शेतकऱ्यांसाठी तांत्रिक प्रशिक्षण आणि कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविण्यावरही चर्चा झाली. यावेळी बाबासाहेब देवकर, उदय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कार्यकारी अभियंता स्मिता माने, अशोक पोवार, डी. एस. शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम उपस्थित होते. प्रशांत कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.