जीवनात सेवा करण्याची संधी सोडू नका : डॉ. बी एम हिर्डेकर

कोल्हापूर प्रतिनिधी : श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सामजिक जाणीवा समृद्ध होतील. या माध्यमातून आपल्याला सेवा भावाची शिकवण मिळत असून आपली जडण घडण ज्या समाजात होते त्या समाजाची सेवा करण्याची संधी कधीही सोडू नका, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी एम हिर्डेकर यानी केले.
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या विद्यार्थ्यांचे निवासी श्रम संस्कार शिबीर निगवे खालसा (ता. करवीर) येथे संपत्र झाले. या शिबिराच्या समारोपावेळी डॉ. हिर्डेकर यानी सेवेचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर व एनएसएस विभाग प्रमुख रुबेन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निगवे खालसा गावात स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, योग प्रात्यक्षिके, प्रबोधनात्मक व्याख्याने आदी उपक्रम पार पडले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, विद्यार्थी कल्याण विभाग संचालक अद्वैत राठोड , प्राचार्य रुधीर बारदेसकर, सरपंच ज्योती दीपक कांबळे , उपसरपंच शिवाजी गणपत पाटील, शाळेचे मुख्याध्यापक बी. जी. खोत, बिद्री साखर कारखाना संचालक आर. एस. कांबळे व एस. आर. पाटील यांच्या उपस्थित या शिबिराचे उद्घाटन झाले.
या शिबिर कालावधीत गावामध्ये स्वछता अभियान, आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, प्रथमोपचार, पोषण आहार याबाबत मार्गदर्शन, डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, फ़िजिओथेरपि शिबीराचे आयोजन करण्यात आले. एनएसएस विद्यार्थ्यांनी महिलांसाठी पाककला, बेकरी पदार्थ प्रशिक्षण घेतले. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धाही घेण्यात आली. शिबीर काळात विविध प्रबोधनात्मक व्याख्याने, करियर संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ युवराज मोटे यांनी भौगालिक पर्यावरणाचे बदलते स्वरूप, डॉ राम पवार यांचे व्यायाम योगाभ्यास व आत्म संरक्षण, डॉ सयाजीराव गायकवाड यांचे वाचन संस्कृती, अर्थ साक्षरता, डॉ. आर एस पाटील यांचे राष्ट्रीय सेवा उपक्रम महत्व या विषयी व्याख्यान झाले.
प्राचार्य रुधीर बारदेस्कर, प्रा. रुबेन काळे, सुरज यादव, रोहन हवालदार, स्वप्नील सरदेसाई यांनी शिबिर यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. या उपक्रमासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव व्ही व्ही भोसले, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. अद्वैत राठोड यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.