धनंजय मुंडे यांचा राजीनामा म्हणजे त्यांची कबुलीच : माजी खा. संभाजीराजे

कोल्हापूर : धनंजय मुंडे यांना किंचितही नैतिकता असती तर अडीच महिन्यांपूर्वीच हा राजीनामा दिला गेला असता. मंत्रिपदाचे कवच घालून आरोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत होता का ? आजचा राजीनामा ही एक प्रकारची कबुलीच आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. सोशल मीडिया X वर त्यांनी ही प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
संभाजीराजे यांनी म्हटले आहे की , संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर पडले, यामुळे केवळ या प्रकरणातील आरोपींचेच नाही तर या आरोपींना पोसणाऱ्या, पाठीशी घालणाऱ्या अनेकांचे चेहरे व या चेहऱ्यांमागची विकृती उघडी पडली आहे. या क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच असल्याचे जाहिरपणे सांगून नि:पक्षपातीपणे या प्रकरणाचा तपास व्हावा, यासाठी धनंजय मुंडेला मंत्रीपदच देऊ नये, अशी मागणी आम्ही अडीच महिन्यांपूर्वी केली होती. मात्र लोकभावना बासनात गुंडाळून मुंडेला मंत्रिपद दिले गेले. राजीनाम्याच्या मागणीकडेही अडीच महिने दुर्लक्ष केले गेले.