डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 4 रूग्णावर मणक्याच्या मोफत शस्त्रक्रिया

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 4 रूग्णावर मणक्याच्या मोफत शस्त्रक्रिया

कोल्हापूर प्रतिनिधी: डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे शनिवारी ४ रुग्णावर मणक्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. स्पाईन फाऊंडेशन मुंबईचे प्रमुख व ख्यातनाम स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलच्या अस्थिरोग विभागाच्यावतीने या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये एका रुग्णावर दुर्बिणीद्वारे पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्याची माहिती अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. एस. ए. लाड यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात विविध कारणामुळे विशेषत: शेतकरी व कष्टकरी लोकामध्ये मणका विकारचे प्रमाण वाढत आहे. अशा गरीब व गरजवंत रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी ४ जानेवारी रोजी मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जन्मजात कुबड असलेल्या १२ व १३ वर्षे वयाच्या दोन मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्याने ७ तासाहून अधिक काळ चालली.

   एका ७० वर्षीय वृद्ध रुग्णाच्या मणक्याच्या चकतीची शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञान वापरून दुर्बिणीद्वारे करण्यात आली. अशाप्रकारची या हॉस्पिटलमधील हि पहिलीच शस्त्रक्रिया आहे. त्याचबरोबर ६० वर्षीय वृद्ध महिलेवरही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी अन्य हॉस्पिटलमध्ये सुमारे १० ते १५ लाख रुपये खर्च येतो. मात्र, डी. वाय. पाटील हॉस्पिटल व स्पाईन फाऊंडेशनच्यावतीने या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या.

डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन स्पाईन फाउंडेशनच्या तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे अभिनंदन केले. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. या उपक्रमासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच स्पाईन फाउंडेशन व हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सेवा अधिकाधिक गरीब रुग्णापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यानी सांगितले.

   स्पाईन फाउंडेशन मुंबईच्यावतीने डी. वाय पाटील हॉस्पिटल मध्ये गेल्या पाच वर्षांपासून स्पाईन ओपीडी आणि सर्जरी हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक गरजवंतावर मोफत उपचार करत आहोत. मुंबई – पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मिळणारे अत्याधुनिक उपचार डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. गरीब व गरजवंतांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्पाईन फाउंडेशनचे प्रमुख डॉ. शेखर भोजराज यांनी केले. 

  डी. वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे स्पाईन फाऊंडेशन मुंबई सहकार्याने मणक्याच्या आजारांवरील विशेष ओपीडी गेल्या पाच वर्षांपासून सुरु आहे. आतापर्यंत १५०० हून अधिक गरीब रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे. तर गंभीर आजार असलेल्या ८८ रूग्णावर मणक्याच्या गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दर शुक्रवारी स्पाईन फाऊंडेशन मुंबईच्या सहकार्याने मणक्याच्या आजारांवरील विशेष ओपीडी सुरु आहे. टेलीकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन स्पाईन फाऊंडेशनच्या डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाते. यातील गरीब रुग्णावर स्पाईन फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात, अशी माहिती डॉ. डॉ. एस . ए. लाड यांनी दिली.

प्रख्यात डॉ. तुषार देवरा, डॉ. हृषीकेश मेहता, डॉ. शैलेश हडगावकर व स्पाईन फाऊंडेशनचे डॉक्टर्स, हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. उदय घाटे,डॉ. प्रदीप पाटील व सहकाऱ्यानी या शस्त्रक्रिया केल्या. यावेळी राजेश पाटील- वाठारकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उप कुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील आदी उपस्थित होते.