अभिनय ही करून पाहण्याची गोष्ट आहे - डॉ. शरद भुथाडिया

अभिनय ही करून पाहण्याची गोष्ट आहे - डॉ. शरद भुथाडिया

कोल्हापूर प्रतिनिधी :  संगीत व नाट्यशास्त्र विभागामार्फत दोन दिवसीय नाट्य कार्यशाळा दिनांक 14 व 15 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत कोल्हापुरातील जेष्ठ रंगकर्मी, प्रसिद्ध अभिनेते डॉ. शरद भुथाडिया यांच्या वास्तवदर्शी अभिनय या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन संगीत व नाट्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या वतीने करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये विभागातील व बाहेरील 30 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

             डॉ. भुथाडिया यांनी वास्तवदर्शी अभिनय म्हणजे नेमकं काय? तो आत्मसात कसा करावा? तसेच अनुभव, सराव, इमोशनल बँक, कृतीचा कार्यकारण भाव ओळखून व त्याचा वापर करून वास्तवदर्शी अभिनयाचे पैलू कसे उलगडायचे हे प्रात्यक्षिकासह सादर केले. डॉ. भुथाडिया यांनी अभिनय करताना विद्यार्थ्यांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांचे त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत निरसन केले. अभिनय हा कृतीचा विषय आहे. चर्चेतून अथवा लेक्चर मधून अभिनय समजेलच असे नाही किंवा शिकता येईलच असे नाही तर तो कृतिशील सातत्यातून अनुभवाच्या पातळीवर आत्मसात करावा लागतो. त्यामुळे नाटकात तालीम आणि प्रात्यक्षिकाला महत्त्व आहे.  या विचारावर कार्यशाळेची सांगता झाली.

          सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत संगीत व नाट्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विनोद ठाकुर देसाई यांनी केले. पाहुण्यांची ओळख व आभार किरणसिंह चव्हाण यांनी मानले.

कार्यशाळेचे व्यवस्थापन मल्हार जोशी व अतुल परीट यांनी केले. यावेळी नाट्यशाखेचे डॉ. संजय तोडकर,रवीदर्शन कुलकर्णी, राज पाटील, विकास कांबळे, युवराज केळुसकर, हे उपस्थित होते.