ना. हसन मुश्रीफ यांच्याकडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा

ना. हसन मुश्रीफ यांच्याकडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात विविध विषयांवर आढावा बैठका घेण्यात आल्या. 

या बैठकीत नागरिकांच्या विविध विनंती अर्जांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये कागल नगरपरिषद येथे वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर सेवेत घेणेबाबत उपस्थित झालेल्या मुद्दयावर मॅटकडे जाता येईल असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. म्हाकवे (ता. कागल) येथील गट क्र. 79 मधील जागा बौद्ध समाजाच्या बुद्धविहारसाठी नोंद करून देणे बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

तसेच गडहिंग्लज येथील व्यंकटेश बिलावर यांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजूर करणेबाबत प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगितले परंतु यामध्ये शासनाकडून 28 जुलै रोजी जाहीरात दिली जाणार आहे त्यानुसार विहीत अर्ज करावा असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गडहिंग्लज नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. 1 मधील मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देणे, फेरफार क्र. 42397 अन्वये सिटी सर्व्हे पत्रकात नोंद करणे, यावेळी बिनशेती जमीन असलेल्यांना देता येईल उर्वरीत लोकांचे प्रांत, मुख्याधिकारी, तहसिलदार व तालुका उपनिबंधक यांच्या समितीद्वारे निर्णय घेऊन प्रश्न सोडवावेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.

मौजे कानोली (ता. आजरा) येथील प्लॉट धारकांना 2008 प्रमाणे 7/12 व कब्जापट्टी देणेबाबत मंत्री मुश्रीफ यांनी याबाबत शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय येत्या महिनाभरात होईल, मग करता येईल असे सांगितले. तसेच कागल नगरपरिषद हद्दीतील प्रॉपर्टी उतारे व मोजणी नकाशे स्वतंत्र मिळत नसल्याबाबतची विसंगती दूर करणे या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा झाली. राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 च्या सहापदरीकरणासाठी कागल येथील सर्व्हे नं. 7 पैकी थांबवलेले भूसंपादन आणि अद्याप दिली न गेलेली नुकसानभरपाई तसेच रस्ता रद्द करण्याबाबत रावजी पाटील व इतरांच्या अर्जावरही तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. या बैठकीत सर्व संबंधित विभागांना चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिले.

या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांदे, प्रसाद चौगुले, हरीश सुळ, भूसंपादन अधिकारी अर्चना नष्टे, नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.