धनंजय मुंडेंना धक्का ; न्यायालयाने घरगुती हिंसाचाराप्रकरणी ठरवलं दोषी

धनंजय मुंडेंना धक्का ; न्यायालयाने  घरगुती हिंसाचाराप्रकरणी ठरवलं दोषी

मुंबई: करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात घरगुती हिंसाचाराप्रकरणी जी तक्रार केली होती, त्या प्रकरणात महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे दोषी ठरले आहेत. त्यावर न्यायालयाने निर्णय देत धनंजय मुंडे हे दोषी असल्याचं सांगितलं आहे. वांद्रे येथील कौटुंबीक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर आता करुणा शर्मा यांना दरमहा २ लाख रुपये देण्यात यावे असाही आदेश न्यायालयाने दिला नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया देत हा सत्याचा विजय असल्याच  म्हटलं आहे.

एका खासगी  वृत्तवाहिनीला  दिलेल्या प्रतिक्रियेत करुणा शर्मा म्हणाल्या की, मी न्यायालयाचे खूप आभार मानते, आज सत्याचा विजय झाला आहे. न्यायालयात न्याय मिळत नाही असं लोकांना वाटतं, पण मला न्याय मिळाला आहे. याआधीही औरंगाबार न्यायालयात माझा विजय झाला होता. आजही माझ्या बाजुने निकाल लागला, मी न्यायालयाचे आणि न्यायाधीशांचे आभार मानते.

माझी  मुलं माझ्यासोबत आहेत, त्यामुळे तिघांना ५-५ लाख असे १५ लाख मिळावे अशी माझी मागणी होती. पण, न्यायालयाने २ लाख दिले, या निर्णयाविरोधात मी उच्च न्यायालयात पुन्हा दाद मागणार आहे.

काय म्हणाल्या करुणा शर्मा ? 

गेल्या तीन वर्षांपासून मी फक्त पोटगीसाठी लढत आहे. मी सांगू शकत नाही की मला किती त्रास झाला आहे, असं बोलताना करुणा शर्मांना रडू आवरलं नाही. विना नवऱ्याचं जगणं एका महिलेसाठी किती अवघड आहे. जेव्हा आपला नवरा खूप मोठ्या पदावर असतो, संपूर्ण सिस्टिम त्याच्या बाजूने असतं, त्याच्यासोबत लढणं खूप कठीण असते. एका मंत्र्यासोबत माझी लढाई होती. माझ्या वकिलासमोर खूप मोठे वकील होते. मी माझ्या वकिलांचेही आभार मानते. बीडचे वकील गणेश कोल्हे यांनी माझ्याकडून एक रुपयाही न घेता हा खटला लढला. आज आमचा विजय झाला आहे. त्यांच्यासोबत मोठमोठे राजकारणी होते, माझ्यासोबत साधारण वकील होते.

मी १०० टक्के लढाई लढली आहे. पण ही लढाई पुढेही सुरुच राहणार, दोन लाखात काही होत नाही, १५ लाख पोटगी मिळावी यासाठी मी हाय कोर्टात जाणार असल्याचंही करुणा शर्मा  यांनी सांगितले आहे.