बीडमध्ये वाल्मिक कराडच्या आईचे ठिय्या आंदोलन, म्हणाल्या ...
बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ माजली आहे. सोमवारी (१३ जानेवारी) ला मस्साजोग येथे संतोष देशमुख यांचे धाकटे भाऊ धनंजय देशमुख यांनी टाकीवर चढत आंदोलन केलं, तसेच आत्महत्या करण्याचाही इशारा दिला. तर, न्याय न मिळाल्यास ग्रामस्थांनीही सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. यावेळी मस्साजोग येथे मोठ्या तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर आज परळीत या घटनेतील अटकेत असलेले आरोपी वाल्मिक कराडच्या आईने परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.
माझ्या लेकाने काही केलं नाही
दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेला वाल्मिक कराडवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा खोटा गुन्हा असून गलिच्छ राजकारणापायी माझ्या मुलावर अन्याय केला जात आहे. त्याच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या आणि माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मिक कराड यांच्या ७५ वर्षीय आई पारुबाई बाबुराव कराड यांनी सकाळपासून परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे. माझ्या लेकाने काही केलं नाही, त्याच्यासाठी मी जीवही द्यायला तयार आहे, असं पारुबाई कराड म्हणाल्या.