मोटारसायकल अपघातात नागावच्या महिलेचा मृत्यू ; परिसरात हळहळ

शिरोली एमआयडीसी : सोमवारी रात्री अंबप - कासारवाडी ( ता . हातकणंगले) या दरम्यान मोटरसायकलवरुन प्रवास करत असताना महिलेचा तोल जाऊन पडल्याने नागाव ता. हातकणंगले येथील महिलेचा मृत्यू झाला. कोल्हापूर येथील दवाखान्यात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. संगीता कृष्णात माळी ( वय ३९ ) असे मयत महिलेचे नाव असून हा अपघात सोमवारी रात्री १०:३० वाजता घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबप ता. हातकणंगले गावची यात्रा सुरू असल्याने संगीता माळी या पती व मुलगा यांच्यासोबत पाहूण्यांकडे सोमवारी रात्री जेवणासाठी गेल्या होत्या. जेवण करून त्या नागाव गावाकडे परत येत असताना अंबप कासारवाडी दरम्यानच्या रस्त्यावर त्या अचानक गाडीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास जोराचा मार लागला होता. त्यांच्यावर कोल्हापूरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा आज सकाळी ८ वाजण्यासुमार मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.