ध्येया प्रति वेडे व्हा –ध्रुव मोहिते; केआयटी मध्ये स्प्रिंटर्स २०२४ दिमाखात संपन्न

ध्येया प्रति वेडे व्हा –ध्रुव मोहिते; केआयटी मध्ये स्प्रिंटर्स २०२४ दिमाखात संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या वॉक विथ वर्ल्ड या विद्यार्थी व्यासपीठाच्या वतीने ‘स्प्रिंटर्स २०२४’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ४ वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या प्रवासामध्ये स्वतःचा कशाप्रकारे विकास केला पाहिजे हा हेतू या २ दिवसीय कार्यक्रमाचा होता. कार्यक्रमाच्या समारोपासाठी कोल्हापुरातील बांधकाम क्षेत्रातील ख्यातनाम तरुण उद्योजक मा. ध्रुव मोहिते उपस्थित होते. कार्यक्रमात त्यांनी मुलांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. आपली महाविद्यालयीन वाटचाल, त्यांच्या वेळच्या आणि आत्ताच्या परिस्थितीतील असलेला बदल आणि सुसंवाद कसा साधला पाहिजे यावर उत्तम मार्गदर्शन केले.‘ध्येय वेडे व्हा.कोणतेही काम १००% आत्मीयतेने केले पाहिजे त्याचबरोबर जी परिस्थिती समोर येईल त्याला सामोरे जा आणि त्याला तोंड द्या’ असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटन केआयटीचे रजिस्ट्रार डॉ.एम.एम.मुजुमदार यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सत्रात त्यांनी अशा प्रकारच्या उपक्रमाची आवश्यकता असल्याचे नमूद करून आयोजक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.पहिल्या दिवशी कार्यक्रमामध्ये ३ सत्रांचा समावेश होता. पहिल्या सत्रांमध्ये आदित्य साळुंखे, जान्हवी भोसले आणि अवनी शिंदे यांनी ‘सुसंवाद (कम्युनिकेशन)’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुसरे सत्र ‘नेटवर्किंग आणि सोशालायझिंग’ या विषयावर होते. ज्यामध्ये आदिप देसाई आणि शिवांजली पाटील यांनी ‘लिंक्ड-इन’ या माध्यमावर मार्गदर्शन केले. याचबरोबर टेक्निकल सत्रामध्ये राजवर्धन नलवडे, समीक्षा बुधले आणि अथर्व तेलंग यांनी मुलांना विविध कोडींग प्लॅटफॉर्मचा आणि युट्युब माध्यमांचा कुशल वापर या बाबत तपशीलवार मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी ‘ट्रेजर-हंट’ या स्पर्धेतून सामुहीकता,निर्णय क्षमता याचा अनुभव घेतला. इंजिनिअरिंगची चार वर्षे या विषयावरती यश पोवार आणि जान्हवी वणकुद्रे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही या सर्व सेशन्समध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

 

केआयटीचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी महाविद्यालयात असलेल्या विविध विद्यार्थी व्यासपीठातून विद्यार्थ्यांचा कशा प्रकारे विकास साधला जात आहे याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.’वेगवेगळे अनुभव घ्या.ही अनुभवांची शिदोरी भविष्यात आपल्याला नक्कीच मदतगार ठरेल असे उद्गार त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. दोन दिवसीय या कार्यक्रमांमध्ये २७०विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास अधिष्ठाता विद्यार्थी उपक्रम डॉ. जितेंद्र भाट, वॉक विथ वर्ल्ड चे समन्वयक प्रा.अमर टिकोळे, सह-समन्वयक प्रा.प्रसाद जाधव आणि विद्यार्थी प्रतिनिधी रिया पवार, सिद्धी यादव, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सुजल माळी यांनी मानले.