आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागासाठी डॉ. प्रभंजन माने फ्रान्सला रवाना

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रभंजन माने हे आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना झाले आहेत.
फ्रान्समधील ले मान्स विद्यापीठात दि. १३ व १४ मार्च २०२५ रोजी सुप्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक डब्ल्यू. समरसेट मॉम यांच्या साहित्यावर आधारित “हाउ गुड मॉम वॉज: ए क्रिटिकल रिअॅसेसमेंट” या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या प्रतिष्ठित परिषदेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने यांना मॉम यांची प्रसिद्ध कादंबरी ‘ऑफ ह्युमन बाँडेज’विषयी शोधनिबंध सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
परिषदेच्या निमित्ताने विविध देशांतील संशोधक, साहित्यप्रेमी आणि अभ्यासकांना मॉम यांच्या साहित्यिक योगदानाचा नव्याने विचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मॉम यांच्या कथालेखन, कादंबऱ्या, नाटके, निबंध, प्रवासवर्णन, चित्रपट रूपांतरणे आणि सांस्कृतिक स्थानांतरण या विविध साहित्यप्रकारांवरील योगदानाचा सखोल अभ्यास आणि विचारविनिमय परिषदेत होणार आहे.
डॉ. माने यांचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शोधपत्रिकांतून ४० शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांच्या हाताखाली ६ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चे संशोधन केले आहे. मॉम यांच्या ‘ऑफ ह्युमन बाँडेज’ या कादंबरीमधील नैतिकता, स्वातंत्र्य आणि आत्मसाक्षात्कार यांचे संशोधनात्मक व चिंतनशील विश्लेषण त्यांनी केले आहे. अस्तित्ववाद, स्पिनोजाचे तत्त्वज्ञान आणि सामाजिक नैतिकतेचे बंधन यांचा प्रभाव कसा पडतो, याविषयीही आपल्या शोधनिबंधात त्यांनी सविस्तर विवेचन केले आहे.