पराजयाच्या भीतीपोटी विरोधकांचे बेछूट आरोप : तानाजी पाटील

पराजयाच्या भीतीपोटी विरोधकांचे बेछूट आरोप : तानाजी पाटील

कोल्हापूर  (प्रतिनिधी) - मौजे कणेरीवाडी येथे नळ पाणीपुरवठा योजनेच्या सुधारणा कामात नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार आमच्यापर्यँत आली होती. या संदर्भातील चौकशीसंदर्भात आम्ही जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. मात्र विरोधकांना या निवडणुकीत आपला पराजय स्पष्ट दिसू लागल्याने त्यांनी लोकांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच ते असे बेछूट आरोप करत आहेत. अशी टीका मुडशिंगीचे माजी सरपंच तानाजी पाटील यांनी केली.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ उजळाईवाडी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी कणेरी येथील प्रचार सभेत केलेल्या आरोपांना त्यांनी सडेतोड उत्तर दिले. महाडिक कुटुंबाने सातत्याने कोल्हापूरच्या विकासासाठी काम केले आहे. येथील सामान्य माणसाला न्याय मिळावा हीच त्यांची भूमिका राहिली आहे. मौजे कणेरीवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असणारे काम नियम मोडून केले जात होते. या कामासाठी बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्या या ग्रामपंचायतीच्या जमिनीवर बांधणे बंधनकारक आहे. मात्र या टाक्या खाजगी जमिनीवर बांधल्या जात आहेत, अशी तक्रार काही ग्रामस्थांनी केली होती. म्हणून या कामाची चौकशी व्हावी या कारणास्तव महाडिक हे पत्र लिहिले होते. मात्र विरोधकांचा पोटशूळ उठला आहे म्हणून नीट शहानिशा ही न करता ते सुसाट वक्तव्ये करत सुटले आहेत. असे ते यावेळी म्हणाले.

दरम्यान "महायुती सरकार राज्यात पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्क्याने निवडून येणार आहे. सरकारच्या विकासात्मक व कल्याणकारी धोरणांवर जनता प्रचंड खुश आहे. त्यांनी त्यांचे सरकार आधीच निवडले आहे. तसेच आम्ही केलेल्या कामांवर व कोल्हापूरच्या जनतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. कोल्हापूरची जनता समजूतदार आहे. असल्या बिनबुडाच्या वक्तव्यामुळे काहीही साध्य होणार नाही. २३ तारखेला जनतेचा निर्णय सर्वांच्या समोर असेल. जनता पुन्हा एकदा बहुमताने महायुतीच्या सोबत उभी राहणार आहे." असा, विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.    

*प्रतिक्रिया*

माझ्या माहितीप्रमाणे जल जीवन मिशन ही केंद्र सरकारची योजना आहे. याच योजनेच्या माध्यमातून पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. येथील स्थानिक कंत्राटदार तथा काँग्रेसचे नेते शशिकांत खोत यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. याआधी रस्ते व गटारीच्या कामात त्यांनी ७० - ८० लाख रुपयांचा घोटाळा केला आहे. कणेरी येथे अमल महाडिक आमदार असताना आरोग्य उपकेंद्र उभारण्यासाठी निधी मंजूर झाला होता. सदरचे आरोग्य उपकेंद्र उभे करण्याच्या कामात खोत यांनीच खोडा घातला होता. मात्र त्याला दाद न देता महाडिक यांनी दुसऱ्या जागेत हे उपकेंद्र उभे केले. त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य करताना एकदा स्वतःचेही आत्मपरीक्षण केले पाहिजे.

*खोत यांचे मानसिक संतुलन बिघडले* 

शशिकांत खोत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. जिल्हापरिषद मध्ये उपाध्यक्ष असताना त्यांनी केलेला भ्रष्टाचार बाहेर येऊन त्याची चौकशी होण्याची शक्यता असल्याने त्यांना भीती वाटते आहे. खोत कुटुंबियांकडे जिल्ह्यातील बरीचशी कंत्राटे आहेत, ज्यामध्ये त्यांनी भरभरून भ्र्रष्टाचार केला आहे. याबाबत चौकशीचा ससेमिरा लागण्याच्या भीतीने ते उचलली जीभ लावली टाळ्याला असे वागत आहेत. महाडिकांचे नाव घेऊन बोलण्याइतके मोठे नेते ते नाहीत. अशा प्रकारचे वक्तव्य करत असताना भान राखणे गरजेचे आहे.