पहिला श्रावण सोमवार निमित्त कसबा बीड व महादेव सातेरी मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा

करवीर (प्रतिनिधी) - कसबा बीड व महादेव सातेरी मंदिर येथे पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे सकाळपासूनच मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या. श्रावणमासी हर्ष माणसी या उक्तीप्रमाणेच प्रत्येक गावातील महादेव मंदिरामध्ये सकाळपासूनच महादेवाच्या पिंडीला अभिषेक व बेल अर्पण ,,धुपारती, पंचारती, करण्यात सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले होते.
कसबा बीड परिसरामध्ये पाडळी खुर्द , कोगे, महे, सावरवाडी या पंचक्रोशी मधून पहिल्या श्रावण सोमवार असल्याने आकाशातून पडणारा पाऊस व पुलावर आलेले पाणी याचा विचार न करता सर्वजण महादेवाच्या दर्शनासाठी जात असलेले दिसत होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ओम नमः शिवाय या नामाच्या गजरामध्ये मंत्रमुग्ध झाले होते. एकंदरीत कसबा बीड परिसरामध्ये पहिला श्रावण सोमवार अत्यंत उत्साहात संपन्न झाला.