पुनर्वसन विषयक अडचणी असल्यास अर्ज करावेत

कोल्हापूर (प्रतिनिधी) - प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन विषयक अडीअडचणी असल्यास त्याचे समाधान करण्यासाठी 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे कार्यालयीन वेळेत प्रकल्पग्रस्तांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जदार, प्रकल्पग्रस्त यांनी या मोहीम कालावधीत आपले अर्ज आवश्यक त्या कागदपत्र, पुराव्यांसह जिल्हा पुनर्वसन कार्यालयात सादर करावेत. या प्राप्त अर्जांची छाननीनंतर आवश्यक अहवाल प्राप्त करवून घेवून 30 दिवसात तपासणी होईल. यानंतर एक दिवस ठरवून देऊन संबंधित अर्जदारांच्या शंकांचे निराकरण करण्याबरोबरच केलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदारांना अवगत करण्यात येणार असल्याची माहिती, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.
राज्यात 100 दिवसांचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविण्यात आला असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाचा शुभारंभ 1 मे रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाला आहे. या अभियानांतर्गत सर्वसामान्य जनतेच्या अडचणी/ तक्रारींची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य व तत्परतेने सोडवणूक करण्याकरीता प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन विषयक अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टीने ही मोहीम राबवण्यात येणार आहे.