भंगार गोळा करणार्या मारूती कांबळेला कृष्णराज महाडिक यांच्याकडून मिळाला मायेचा हात
कोल्हापूर (प्रतिनिधी) : सुरेल आवाजात गाणी गाऊन लक्ष वेधणारा आणि स्क्रॅपचे साहित्य गोळा करणारा एक अवलिया राजारामपूरीमध्ये फिरत असतो. भंगारवाला अशी ओळख असलेल्या, त्या व्यक्तीच्या गळ्यात मात्र सुरांची जादू आहे. दौलतनगर परिसरात राहणार्या या अवलिया कष्टकर्याची युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी भेट घेतली आणि त्याला प्रोत्साहन दिले. श्रमसंस्कृतीला जीवनशैली बनवतानाच, या भंगारवाल्याची कला कायम रहावी, यासाठी त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन कृष्णराज महाडिक यांनी दिले.
कोल्हापुरातील राजारामपूरी परिसरात एक भंगार गोळा करणारा व्यक्ती हातगाडी घेवून फिरत असतो. विशेष म्हणजे अतिशय सुंदर गाणी म्हणत हा व्यक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेतो. दौलत नगर परिसरातील तीन बत्ती चौकात राहणार्या मारूती कांबळे याच्या आयुष्याची कहाणी दु:खद आहे. पण तरीही खचून न जाता, मारूती दारोदार फिरतो आणि लोकांच्या घरातील प्लास्टिक, पत्रा असं भंगार गोळा करतो. मारूती कांबळे स्वत: पायाने अधू आहे. एका अर्थी तो अनाथ आहे. पण मारूती कांबळेची जिद्द आणि त्याची कला याबद्दलची माहिती युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांना समजली आणि त्यांनी आवर्जुन मारूतीची नुकतीच भेट घेतली. अतिशय सुरेल आवाजात गाणारा मारूती आर्थिक अडचणीत आहे. कृष्णराज यांनी त्याला दिलासा देण्याचा आणि त्याच्या कलागुणांचा सन्मान करण्यासाठी पाऊल उचलले. दसर्याच्या दिवशी कृष्णराज महाडिक यांनी, मारूती कांबळेला एका दागिन्यांच्या दुकानात नेले आणि चक्क त्याच्यासाठी एक सोन्याची अंगठी खरेदी केली. कृष्णराज यांनी ही अंगठी मारूती कांबळेकडे सुपूर्द केली. तेंव्हा त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. याकृतीतून कृष्णराज यांनी जिद्दीचा आणि कलेचा सन्मान केला. तसेच मारूती कांबळेच्या आयुष्यावर कृष्णराज यांनी एक व्हिडिओ ब्लॉगही बनवला आहे. कृष्णराज महाडिक यांच्या या संवेदनशिल कृतीचे कौतुक होत आहे.