भारतातील आर्थिक सुधारणांचे जनक मनमोहनसिंग

भारतातील आर्थिक सुधारणांचे  जनक मनमोहनसिंग

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरु प्रा. हांडा यांनी सिंग यांच्यातील सुप्त गुण बघून 'तू एक दिवस राजकारणात नाव कमावशील' असे भाकीत केले होते. हे अगदी खरे ठरले. मनमोहन सिंग केवळ देशाच्या राजकारणातच चमकले असे नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणातही अर्थतज्ञ पंतप्रधान म्हणून ते चमकले. जगातील सर्वाधिक शिकलेला राष्ट्रप्रमुख म्हणूनही नावलौकिक मनमोहन सिंग यांना मिळाला. त्यांचे गुरुवारी २६ डिसेम्बरला निधन झाले. 

 डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी गाह, पंजाब (पाकिस्तान) येथे झाला. प्राथमिक शिक्षण पंजाबमध्ये (पाकिस्तान)  झाले. एम. ए. अर्थशास्त्र  पंजाब विद्यापीठातून  (चंदिगड ) पदवी घेतली. केम्ब्रिज विद्यापीठातहि त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला. ऑक्सफर्ड विद्यापीठातून डी. फिल पदवी मिळवली. त्यांनी १४ वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष, केंद्रीय अर्थमंत्री, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते , देशाचे तेरावे पंतप्रधान - कार्यकाळ  २२ मे २००४ ते २६ मे २०१४ पर्यंत. अशी त्यांच्या कार्याची चढती कमान आहे. 

पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून  मनमोहन सिंग कार्यरत असताना १९९१ साली भारताकडे फक्त २० दिवस पुरेल इतकेच अडीच अब्ज डॉलर परकीय चलन शिल्लक होते. पेट्रोल, डिझेल, गॅस आयात करण्यासाठी केवळ दोन आठवडे पुरेल इतकाच पैसा  उरला होता. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणासह २५ अटी घालून नाणे निधीने भारताला कर्ज दिले. मनमोहन सिंग यांनी उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची धोरणं स्वीकारली. या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेसाठी खुली झाली. यामुळे खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन मिळालं आणि त्याशिवाय परदेशी गुंतवणूकदेखील आकर्षित झाली. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत झपाट्याने वाढ झाली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या अनेक धोरणांमुळे भारताला मोठा फायदा होत देशाची प्रगती झाली.

 आर्थिक योगदानासाठी त्यांना पद्मविभूषणसह अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. १९९१ मध्ये पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची धोरणं राबवून भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली होती. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये जोखीम आणि सावधतेच्या मिश्र धोरणाने भारतीय अर्थव्यवस्था ९ टक्कयांच्या वेगाने आर्थिक विकास साधून नवी उंची गाठली. भारतातील आर्थिक सुधारणांचे ते जनक ठरले. त्यांच्या या कार्याचा  जगभर गवगवा झाला.