... तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश देण्याचा अधिकार रद्द

... तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश देण्याचा अधिकार रद्द

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : अमेरिकेतील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असलेल्या हार्वर्ड विद्यापीठ आणि ट्रम्प प्रशासनातील वाद आणखी तीव्र होत चालला आहे. याआधी दोन मोठी अनुदानं गोठवल्यानंतर, आता अमेरिकी गृहमंत्रालयाने हार्वर्डला आणखी कठोर आदेश दिले आहेत.  विदेशी विद्यार्थ्यांनी केलेल्या बेकायदा आणि हिंसक कृतींचा सविस्तर अहवाल ३० एप्रिलपर्यंत सादर करावा, अन्यथा विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा विशेषाधिकार रद्द केला जाईल, असा इशारा दिला गेला आहे.

गृहमंत्री क्रिस्टी नोएम यांनी याबाबत हार्वर्डला एक कठोर भाषेतील पत्र लिहिले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, “विद्यापीठ प्रशासनाने ‘स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर प्रोग्राम’ (SEVP) साठी आवश्यक असलेली माहिती वेळेत दिली नाही, तर त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल.”

नोएम यांच्या मते, “हार्वर्डच्या निष्क्रिय नेतृत्वामुळे ज्यू विरोधी भावना वाढीस लागल्या असून, परिसरात दहशतवाद्यांच्या समर्थकांकडून वातावरण बिघडवले जात आहे. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, विदेशी विद्यार्थी आणि काही प्राध्यापक ज्यू विद्यार्थ्यांवर द्वेषपूर्ण वर्तन करत आहेत.” त्यांच्या म्हणण्यानुसार, “अमेरिकन करदात्यांच्या पैशांनी चालणाऱ्या संस्थांकडून देशविरोधी विचारसरणीला प्रोत्साहन मिळणे हे अत्यंत चिंताजनक आहे.”

अनुदान रद्दीकरणाचा निर्णय:

गृहमंत्री नोएम यांनी बुधवारी जाहीर केले की, हार्वर्डला दिल्या जाणाऱ्या २७ लाख डॉलर्सच्या दोन शासकीय अनुदानांची रक्कम रद्द करण्यात आली आहे. त्या म्हणाल्या, “५३.२ अब्ज डॉलर्सच्या देणग्यांवर चालणाऱ्या संस्थेला सरकारी सहाय्याची गरज नाही. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”