Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला आणखी एक झटका ; 'डिजिटल स्ट्राइक' करत केले 'X' अकाउंट ब्लॉक

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एकामागून एक कठोर निर्णय घेतले आहेत. या हल्ल्यात २५ भारतीयांसह एक नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच भारताने पाकिस्तानविरोधात "डिजिटल स्ट्राइक" सुरू करत त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घातली आहे.
भारताच्या आयटी मंत्रालयाने X (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मला आदेश देऊन पाकिस्तान सरकारचे अधिकृत खाते भारतात ब्लॉक करण्यास सांगितले आहे. यामुळे पाकिस्तानचा भारतात सोशल मीडिया प्रभाव निष्प्रभ होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.
पाच कठोर निर्णयांची घोषणा
बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या CCS (कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी) बैठकीत पाकिस्तानविरोधात पाच मोठ्या निर्णयांची घोषणा करण्यात आली. यात अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानी फेसबुक आणि यूट्यूब चॅनेल्सवर बंदी, तसेच राजनैतिक संबंध तात्पुरते तोडणे यांचा समावेश आहे.
दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाची सुरक्षा हटवली
दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेरील तात्पुरती पोलीस सुरक्षा हटवण्यात आली असून, तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक आठवड्याच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली असून अनेक ठिकाणी निदर्शने सुरू आहेत.
NIA ने घेतली तपासाची सूत्रं
हल्ल्यानंतर NIA (राष्ट्रीय तपास संस्था) चे पथक श्रीनगर आणि पहलगाम येथे पोहोचले असून, जम्मू आणि काश्मीर पोलीस यांच्या सहकार्याने तपास सुरु आहे. पाकिस्तानला त्याच्या भूमीवरून होणाऱ्या दहशतवादी हालचालींवर कारवाई करणे भाग पाडणे हा यामागचा सरकारचा हेतु आहे.