महिला सक्षमीकरणासाठी लक्ष्मीमुक्ती योजनेंतर्गत महिलांचे नाव 7/12 पत्रकी नमूद करा - स्वप्निल रावडे

महिला सक्षमीकरणासाठी लक्ष्मीमुक्ती योजनेंतर्गत महिलांचे नाव 7/12 पत्रकी नमूद करा - स्वप्निल रावडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - करवीर तालुक्यातील कुटुंबातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी लक्ष्मीमुक्ती योजनेंतर्गत शेतजमिनीवर (7/ 12) आपल्यासोबत आपल्या पत्नीचे नाव नमूद करुन महिला सक्षमीकरण करण्यास जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करवीरचे तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी स्वप्निल रावडे यांनी केले आहे.

सदर योजनेमध्ये पतीच्या नावे असलेल्या शेतजमिनीमध्ये पत्नीचे सहहिस्सेदार म्हणून नाव विनामुल्य नोंदविण्यात येते. यासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क किंवा मुद्रांक शुल्क आवश्यक नाही. यासाठी अर्जदार पती-पत्नी यांनी आवश्यक कागदपत्रासह संबंधीत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये पती व पत्नी यांच्या संयुक्त स्वाक्षरीतील अर्ज, संबंधीत गटाचा 7/12 उतारा व 8-अ उतारा, आधारकार्ड प्रत, रेशनकार्ड प्रत, विवाह नोंदणी प्रमाणपत्र पोलीस पाटील यांचा कायदेशीर पत्नी असल्याचा दाखला अशी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून करवीरचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानातील 1 मे ते 15 ऑगस्ट असा 100 दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रम आयोजित करणेत आला आहे. यानुसार शासन परिपत्रक क्र.एम.14/21681 प्र.क्र.458/ल.6 दिनांक 25/09/1992 नुसार महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीकोनातून लक्ष्मी मुक्ती योजना करवीर तालुक्यात राबविण्यात येत आहे.