मला मिळालेले हे कॅबिनेट मंत्रीपद जनतेला अर्पण : हसन मुश्रीफ
कोल्हापूर : मला मिळालेले हे कॅबिनेट मंत्रीपद मी सविनयाने तमाम जनतेला अर्पण करीत आहे. आपल्याशी कुणीही कसेही वागू द्या. आपण कुणाबद्दलही वाईट चिंतायच नाही, या तत्त्वाने प्रामाणिकपणा, सचोटी आणि नियत साफ ठेवल्याचेच हे फलित आहे,अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. नागपूर येथे झालेल्या शपथविधीनंतर माध्यमांशी ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाई देवीच्या आशीर्वादाने आणि कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या पाठबळावर मिळालेले ही मंत्रीपद मी मला आशीर्वाद देणाऱ्या तमाम जनतेला सविनयाने अर्पण करतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज छत्रपती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी काम करीत आलो. याच लोककल्याणकारी वाटेवरून पुढे जाण्याचा माझा निर्धार आहे. गेल्या 35- 40 वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत सामान्य माणूस विशेषता; गोरगरीब, दिनदलीत, वंचित आणि उपेक्षित माणूस आणि त्यांचे सर्वांगीण कल्याण या दृष्टीनेच काम करीत आलो. परमेश्वराचे आशीर्वाद, गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आणि जी अखंड रुग्ण सेवा केली त्या रुग्णांचे आशीर्वाद यामुळेच मला सातत्याने विजय मिळत गेला. त्याप्रमाणे जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी अहोरात्र अखंडपणे कठोर मेहनत घेतली. तशीच कठोर मेहनत क्षण आणि क्षण मी अखंडपणे अहोरात्र परिश्रम करेन. येणारी पाच वर्षेही कोल्हापूर जिल्ह्यासह माझ्या मतदारसंघाचा संपूर्ण सर्वांगीण विकास आणि कायापालट करण्यासाठी खर्ची घालू.