मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आढावा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आढावा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन स्वरुपात आत्तापर्यंत 29547 व ऑफलाइन 88470 महिलांनी सहभाग घेतला आहे. शासनाची ही योजना महत्त्वकांक्षी असून गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर चांगल्या प्रकारे नागरिकांना माहिती देवून जास्तीत जास्त महिलांची ऑनलाइन नोंदणी करावी. तसेच कोणीही पात्र महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण जिल्हास्तरीय समिती अमोल येडगे यांनी सर्व संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेला दिल्या. या योजनेबाबतची आढावा बैठक सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकी करिता मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा सहआयुक्त नगर प्रशासन नागेंद्र मूतकेकर, उपायुक्त पंडित पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी निपसे राहूल, महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईनगडे, जिल्हास्तरीय संबंधित विभाग प्रमुख तर ऑनलाईन स्वरूपात सर्व तहसिलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, महिला बालविकास  अधिकारी, गटविकास अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रमुख तहसिल कार्यालयातून व्हीसी द्वारे उपस्थित होते.

बैठकीवेळी गाव निहाय माहिती सादर करण्यात आली. सर्वात जास्त अर्ज प्राप्त झालेली गावे, सर्वात कमी अर्ज प्राप्त झालेली गावे, शहर भागात सर्वात जास्त अर्ज प्राप्त झालेले वार्ड व सर्वात कमी अर्ज प्राप्त झालेले वार्ड याप्रमाणे तपशील सादर करण्यात आला.

कामाला गती मिळणार

ऑनलाइन नोंदणी करताना फोटो अपलोड होताना खूप वेळ लागतो. मात्र आता ऑफलाइन अर्जावरील फोटो वरून अर्जदार महिलेचा फोटो अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व्हर मधे वाढ केल्याने अर्ज भरण्यास गती मिळत आहे. सायंकाळी विशेष यंत्रणेद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या १० दिवसात सर्व ऑफलाइन अर्ज घेण्याचे काम संपवून आलेले अर्ज तत्काळ ऑनलाइन करा याबाबतच्या सूचना बैठकीत दिल्या. 

चांगले काम केलेल्या गावांचा होणार सन्मान

महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या या योजनेत जी गावे संपूर्ण उद्दिष्ट वेळेत पूर्ण करतील, त्या गावांचा, वॉर्डचा आणि अर्ज नोंदणीत काम केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांचा सन्मान प्रशासनामार्फत केला जाणार आहे. तसेच अर्ज ऑनलाइन केलेल्या कर्मचाऱ्यांना मानधनही दिले जाणार आहे. ज्या गावात आणि वार्ड मधे चांगल्या प्रकारे काम झाले आहे तेथील यशस्वी गाथा इतर गावात राबवून योजनेला गती द्या, नाविन्यपूर्ण योजना राबवून जास्तीत जास्त लाभार्थी नोंदणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी यावेळी प्रत्येक गावनिहाय आढावा दैनंदिन स्वरूपात घेण्याच्या सूचना केल्या.