तारीख ठरली! प्रशांत किशोर करणार नव्या पक्षाची स्थापना
बिहार- प्रशांत किशोर, प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराज मोहिमेचे संस्थापक, दोन वर्षांपासून बिहारचा कोपरा न कोपरा पिंजून काढत आहेत. पायी चालत त्यांनी अनेक सभा घेतल्या आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांचा मुख्य उद्देश एकच – बिहारमधील लोकांना एक नवा राजकीय पर्याय उपलब्ध करून देणे.
२ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी, प्रशांत किशोर अधिकृतपणे एक नवा पक्ष स्थापन करणार आहेत. याच दिवशी दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या जनसुराज यात्रेला सुरुवात केली होती. या बाबतची घोषणा त्यांनी याआधीच केली होती.नव्या पक्षाच्या संघटनेच्या व्यवस्थापनासाठी २१ प्रमुख नेत्यांची कार्यकारी समिती स्थापन करण्यात येईल. बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जनसुराज पार्टी सर्व २४३ जागांवर निवडणूक लढवेल.प्रशांत किशोरच्या या नव्या पक्षामुळे बिहारच्या राजकारणात नवीन पर्व सुरू होणार आहे. जनसुराज पार्टीने लोकांना दिलेल्या वचनांची पूर्तता कशी करेल आणि त्यांच्या राजकीय ध्येयांच्या दिशेने कशी वाटचाल करेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.