'रामटेक' बंगला शापीत? दीपक केसरकरांच मोठं विधान, म्हणाले...

मुंबई : मंत्रीमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांना बंगल्यांच वाटप करण्यात आलं. महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला.आता या रामटेक बंगल्याबाबत राजकीय तर्क वितर्क लावले जात आहेत.रामटेक बंगल्यात राहणारा प्रत्येक मंत्री अडचणीत सापडल्याची चर्चा रंगल्यानंतर माजी मंत्री दीपक केसरकरांनी सूतोवाच केले.
मी तर कुठल्या भ्रष्टाचारात सापडलो नाही. त्यामुळे चुकीची माहिती मिळाली आहे. दोन तीन वेळा असं झालं, की माझ्याआधी रावल तिथे राहिले होते, त्यांचं मंत्रिपद गेलं, एवढं मी समजू शकतो. पण तिथे राहिलेला प्रत्येक मनुष्य हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे. शरद पवार राहिले... मुख्यमंत्री झाले.. विलासराव देशमुख झाले... शिवाजीराव पाटील निलंगेकर झाले ... त्यांच्याबाबत तर कुणी अपेक्षाही केली नव्हती. मग तो वाईट आहे का बंगला? असा प्रतिप्रश्न दीपक केसरकर यांनी विचारला.
'त्या' वास्तुचा मला आशीर्वादच मिळाला
एक गोष्ट अशी आहे, की मंत्रिपदावरुन गेल्यानंतर रावल साहेब मला भेटले. ते म्हणाले, माझं गेलं, तुमचंही गेलं. आज लिहून ठेवा, मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर मी जाईन, एवढी त्या बंगल्यात पवित्रता आहे. आज त्या बंगल्यात मी गणपतीची स्थापना केली, कुठलीही वास्तू वाईट नसते, ती आशीर्वाद देत असते, फक्त तुम्हीसुद्धा त्या वास्तूची सेवा करायला लागते, वास्तूला जपायला लागतं, पण मला खात्री आहे की मला आशीर्वाद मिळालेला आहे, अशा भावना दीपक केसरकर यांनी व्यक्त केल्या.
पंकजा मुंडेंनी मागितला 'रामटेक'
फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप झालं आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळाला. रामटेक बंगला महत्त्वाच्या मंत्र्यांना दिला जातो. हा बंगला अतिशय प्रशस्त आहे. मलबार हिल परिसरात असलेल्या रामटेकमधून समुद्रही दिसतो. परंतु बावनकुळेंचे कार्यकर्ते आणि निकटवर्तीय चिंतेत पडले होते. कारण हा बंगला शापित मानला जातो. बंगल्यात वास्तव्य केलेले अनेक मंत्री वादात सापडले आहेत. काही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. मात्र पंकजा मुंडेंनी रामटेक बंगला मागितल्याने बावनकुळेंच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण सुंठीवाचून खोकला गेल्याची भावना त्यांच्यात होती.