लाकडी डेपोजवळ सापडला सात फुटांचा अजगर
कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
कोल्हापुरात चालू असलेल्या सध्याच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वन्यजीव जागा मिळेल तिथे आसरा शोधत आहेत. अशीच एक घटना वारणा दूध संघाच्या लाकडी डेपोजवळ घडली. लांजा येथून आलेल्या लाडकी वाहतूक करणाऱ्या एका ट्रकमध्ये सात फुटाचा अजगर आढळून आला आहे. झाडाच्या बुंध्यात हा भलामोठा अजगर दिसल्याने कर्मचारीही भयभीत झाले.
ही माहिती मिळताच वन विभागाचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल साताप्पा जाधव, वनसेवक पुंडलिक खाडे, रेणुका नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या अजगराला ताब्यात घेतले. सर्पमित्र राहुल इंगळे, मच्छिंद्र गायकवाड, रुसीराज सिद, धीरज इरकर, सौरभ माने, राहुल निंबाळकर, विवेक शिंदे, आनंदा काळे, दिगंबर कुंभार यांनी मोठ्या शिताफीने अजगराला पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले.