शक्तिपीठ महामार्गाविरोधात उद्या पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - नागपूर - गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने उद्या सकाळी १० वाजता शिरोली येथील पंचगंगा नदीच्या पुलावर पुणे - बंगळूरू महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग १२ जिल्ह्यातून जात आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जात असून हजारो शेतकरी भूमीहिन होणार आहेत. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असून या विरोधात रस्त्यावरचा संघर्ष करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीने कंबर कसली आहे.
यामध्ये माजी आमदार ऋतुराज पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, राजू लाटकर, आर. के. पोवार, सचिन चव्हाण, सतीशचंद्र कांबळे, प्रकाश पाटील, शिवाजी मगदूम, विक्रांत पाटील, दिलीप पवार, संदीप देसाई, बाबासो देवकर, चंद्रकांत यादव, रघुनाथ कांबळे, अतुल दिघे, अजित पोवार ( स्वाभिमानी शेतकारी संघटना अध्यक्ष ), सागर कोंडेकर, बाबुराव कदम, शशिकांत खवरे, सुयोग वाडकर, सुभाष देसाई यांच्यासह आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.