शरद पवार गटाला धक्का? दोन माजी मंत्र्यांचा अजित पवार गटात जाण्याचा संकेत

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी उलथापालथ घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे दोन ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या संभाव्य घडामोडीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समजते की पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या दोघांचा औपचारिक पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात अपयशाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असल्याने, अनेक कार्यकर्त्यांमध्ये सत्ताधारी गटात जाण्याची मानसिकता वाढीस लागली आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. सतीश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “सध्या आम्ही विरोधात असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या समस्या सुटत नाहीत. त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल.” या वक्तव्यानंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा अधिक जोरात सुरू झाल्या आहेत.
डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर हे दोघेही जिल्ह्यात प्रभावशाली नेते असून त्यांचा मजबूत जनसंपर्क व संघटनात्मक आधार आहे. त्यामुळे, त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्तेही अजित पवार गटात सामील होऊ शकतात. अशा स्थितीत, स्थानिक निवडणुकांपूर्वीच शरद पवार गटासाठी हे एक मोठं आव्हान ठरू शकतं. आता सर्वांच्या नजरा या दोघांच्या अधिकृत प्रवेशावर लागल्या आहेत.