शेंडा पार्क मधील जागा शासकीय कार्यालये व आयटी पार्कला मिळणेबाबत उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार - पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेंडा पार्क येथील कृषी आणि आरोग्य विभागाकडील जागा जिल्हा क्रीडा संकुल, प्रस्तावित नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आय टी पार्क व अन्य शासकीय कार्यालयांसाठी मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांची आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महानगरपालिका उपायुक्त साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी महेश रणभिसे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शहरातील विविध प्रश्नांचाही आढावा घेऊन सूचना केल्या.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरात माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योगांची वाढ होण्यासाठी व स्थानिक युवकांना रोजगार मिळण्यासाठी शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. यासाठी शेंडा पार्क येथील कृषी विभागाची जागा आयटी पार्कसाठी उपलब्ध झाल्यास आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, तसेच तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यासाठी ही जागा लवकर मिळण्याबाबत प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याविषयीच्या सद्यस्थितीची माहिती दिली.