डी. वाय. पाटील साळवेनगर येथे ज्वेलरी व्यवसायिकांची कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर प्रतिनिधि: डॉ.डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग साळोखेनगर कॅम्पसमधील कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर येथे कोल्हापूर जिल्ह्यातील ज्वेलरी व्यावसायीकांसाठी मीनाकारी या ज्वेलरी कलेचे प्रशिक्षण देणारी कार्यशाळा संपन्न झाली.
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभाग आणि महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ आणि जेम्स अँड ज्वेलरी सेक्टर स्किल कौन्सिल यांच्यावतीने रॅम्प योजनेअंतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आमदार जयश्री जाधव वहिनी यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
कार्यशाळेसाठी ज्वेलरी व्यवसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यापुढेही अशा प्रकारच्या नावीन्यपूर्ण कलांचे प्रशिक्षण कार्यशाळेद्वारे मिळावे अशी मागणी कोल्हापूर सराफ व्यापारी संघामार्फत करण्यात आली.या कार्यशाळेमुळे ज्वेलरी व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी फायदा होईल.
या कार्यशाळेसाठी तज्ञ प्रशिक्षक शिल्पा जाधव यांनी मार्गदर्शन केले. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, संचालक विजयसिंह भोसले व शितल पोद्दार व इतर पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. जिल्हा उद्योग अधिकारी अनमोल कोरे, जिल्हा कौशल्य विकास विभाग सहाय्यक आयुक्त संजय माळी, उद्योग विभाग उपसंचालक श्री. साखरे , नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापक प्रवीण मोरे, डॉ.डी वाय पाटील साळुंखे नगरचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, कोल्हापूर इंक्युबेशन सेंटरचे राजन डांगरे आदी उपस्थित होते. कार्यशाळेत सहभागी झालेल्या सराफ व्यवसायिकांना यावेळी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.