शेतात मशागत करत असतानाच तरूणासोबत घडली दुर्दैवी घटना

शेतात मशागत करत असतानाच तरूणासोबत घडली दुर्दैवी घटना

पुणे - इंदापूर तालुक्यातील गोखळी गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात रोटाव्हेटरने मशागत करत असताना विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने २० वर्षीय गणेश जयवंत खरात याचा शॉक लागून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती अमोल खरात यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरंगवाडीचे माजी सरपंच तुकाराम बलभीम करे यांनी फोनवरून ही दुर्घटना घडल्याची माहिती दिली होती. अमित हनुमंत जाधव यांच्या शेतात गणेश रोटाव्हेटर चालवत होता. काम करत असताना रोटाव्हेटरमध्ये विजेची तार अडकली. गणेशने ती तार हाताने काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच क्षणी त्याला जोरदार विद्युत धक्का बसला.

गंभीर अवस्थेत त्याला इंदापूरमधील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. नंतर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. गणेश खरात यांच्या अकाली निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. इंदापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.