आता शिक्षकांनाही गणवेश , शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे संकेत

आता शिक्षकांनाही गणवेश , शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे संकेत

मुंबई: डॉक्टर आणि वकिलांसारख्या प्रतिष्ठित व्यावसायिकांना जसा एक विशिष्ट पोशाख असतो, तसा पोशाख शिक्षकांसाठीही असायला हवा, असे मत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. मालेगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी शिक्षकांसाठी गणवेशासंदर्भात संकेत दिले.

मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले की, राज्यभर एकसमान शिक्षक गणवेश लागू होणार नाही, मात्र प्रत्येक शाळेने आपल्या स्तरावर एकसमान गणवेश ठरवावा, अशी सूचना त्यांनी केली. या कार्यक्रमात उपस्थित जिल्हा परिषद शाळेच्या महिला शिक्षकांनी एकसारखी साडी नेसल्याचे उदाहरण देत, त्यांनी त्या एकरूपतेचे कौतुक केले आणि संपूर्ण राज्यातील शिक्षकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, असेही सांगितले.

त्यांनी स्पष्ट केले की, "शिक्षकांनी काय घालावे, याबाबत वस्त्रसंहिता आधीच अस्तित्वात आहे. आता केवळ एकसमान पोशाखाची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी गणवेशाचा विचार आहे." समाजात डॉक्टर, वकील यांना त्यांच्या गणवेशामुळे ओळख व सन्मान मिळतो, तसाच सन्मान शिक्षकांनाही मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दुसरीकडे, शिक्षकांमधून या प्रस्तावावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिक्षक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटोळे यांनी सांगितले की, "वस्त्रसंहिता असताना गणवेशाची गरज काय? प्रत्येक शिक्षक किंवा शिक्षिकेला गणवेश सुसंगत वाटेलच असे नाही. कपड्यांबाबत थोडे स्वातंत्र्य हवेच."