अंजली दमानिया यांचा मोठा आरोप, म्हणाल्या विविध शहरात कराडची वाईन शॉप ज्याची किंमत...
मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे . आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत आणखी एक दावा केला आहे. बीड जिल्ह्यातील विविध शहरात कराडची वाईन शॉप आहेत, प्रत्येक दुकानाचा बाजार भाव पाच कोटी आहे, असा आरोप दमानिया यांनी एका पत्राच्या हवाल्याने केला आहे. एक्स सोशल मीडियावरुन अंजली दमानिया यांनी ट्वीट करत काही पत्रं सादर केली आहेत.
काय ट्वीट केलंय ?
एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आले, ज्याची माहिती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. पत्रात लिहिले आहे, की समाजसुधारक वाल्मिक कराड यांची केज, वडवनी, बीड आणि परळी येथे चार ते पाच वाईनची दुकाने आहेत. प्रत्येक वाईन दुकानाचा बाजार भाव ५ कोटी इतका आहे, असे अंजली दमानिया यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
दमानियांची घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
अंजली दमानिया यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरले आहे. त्यांनी हत्येसंदर्भात अनेक दावे करत धनंजय मुंडेंना घेरले आहे. याच संदर्भात दमानियांनी काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती. सागर बंगल्यावर झालेल्या भेटीच मुख्यमंत्र्यांकडे पाच मागण्या केल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. या प्रकरणी सरकारने ठोस पाऊले उचलावीत, अशी अपेक्षा दमानिया यांनी व्यक्त केली होती.
काय आहेत दमानियांच्या मागण्या ?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटी रद्द करण्यात यावी, बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसाठी हॉटलाईन बनवण्यात यावी, मला बीडमधून तक्रारींचे अनेक कॉल येत आहेत. त्यासाठी तक्रार नोंदवून घ्यावी. बीडमधील शस्त्र परवाने तपासण्यात यावेत, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांना केल्याचं अंजली दमानियांनी सांगितलं.