खोकेसम्राट आबिटकरांचा गद्दारी आणि कमिशनखोरीमुळे पराभव निश्चित : के पी पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी मूळ शिवसेनेशी केलेली गद्दारी आणि टक्केवारी व भागीदारीच्या माध्यमातून केलेली प्रचंड कमिशनखोरी हे मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोचले असून यामुळे त्यांचा पराभव निश्चितपणे होणार असल्याचा विश्वास माजी आमदार के पी पाटील यांनी व्यक्त केला.
राशिवडे (ता.राधानगरी) येथे प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीने महारॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. या दरम्यान झालेल्या सभेत पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले,"विद्यमान आमदारांनी मतदारसंघात केलेली निकृष्ट कामे व त्या माध्यमातून दहा वर्षांत जमवलेली प्रचंड मोहमाया,मोजता येणार नाही एवढ्या एकरांची जमीन,त्यांची गर्वाची व ठोकशाहीची भाषा,स्वतः आमदार व त्यांचे बंधू यांची एकाधिकारशाही व हुकूमशाही प्रवृत्ती,बगलबच्चांना दिलेली ठेकेदारी,अनेक कामांमध्ये त्यांची असलेली स्लीपिंग पार्टनरशिप,स्वतःचा गट वाढविण्याच्या नादात दुसऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना मूळ पक्षापासून तोडण्याची वृत्ती हे सर्व त्यांच्या आमदारकीच्या काळात राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने अनुभवले होते. आम्ही महाविकास आघाडीच्या प्रचारसभा व प्रचार दौऱ्यांच्या माध्यमातून गेल्या पंधरा-वीस दिवसांच्या प्रचाराच्या कालावधीत नेमक्या याच त्यांच्या दुर्गुण आणि प्रवृत्तीवर जोरदार आसूड ओढले आणि सर्वसामान्य मतदारांना जागरूक केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचारासाठी घेतलेली पहिली सभा,खासदार छत्रपती शाहू महाराज यांचे पाठबळ आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी माझ्या विजयाची घेतलेली जबाबदारी यासह महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवसापासून पायाला भिंगरी बांधून आबिटकरांच्या विरोधी वातावरण निर्माण केल्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित आहे."
गोकुळ दूध संघाचे माजी संचालक पी डी धुंदरे म्हणाले," के पींच्या विजयासाठी मतदार संघात अनुकूल वातावरण तयार झाले असून राशिवडे गाव यामध्ये निर्णायक भूमिका बजावणार अशी आम्ही खात्री देतो."
गोकुळ दूध संघाचे संचालक प्रा. किसन चौगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले,सदाशिवराव चरापले,कृष्णात बापू पाटील,धैर्यशील पाटील,अभिजीत तायशेटे,बी के डोंगळे,संजयसिंह पाटील, विश्वनाथ पाटील,संजय कलिकते,धीरज डोंगळे,सुधाकर साळोखे, विनय पाटील,सागर धुंदरे, दीपक नवणे,एकनाथ पाटील,रवींद्र पाटील, उत्तम पाटील,सुशील पाटील आदी उपस्थित होते.
विजय नक्की.... गुलाल बाकी !
प्रचाराचा सांगता दिवस असल्याने या सभेमध्ये के पी पाटील यांनी एकूणच मतदार संघातील सद्यस्थितीतील राजकीय वातावरणाचा अंदाज मांडला. ते म्हणाले,"मतदार संघामध्ये आपल्या विजयाच्या बाजूने सकारात्मक वातावरण निर्मिती झाली असून अनेक गावांमध्ये मोठे मताधिक्य मिळणार आहे. एकूणच आपला विजय नक्की झाला असून फक्त गुलाल उधळायचा बाकी आहे. येत्या २३ तारखेला तोही आनंद आपण सारेजण साजरा करूया."