तरुणांसह महिलांसाठी रोजगार निर्मितीला प्राधान्य ;मतदारसंघ पर्यटन व इतर उद्योगातही अग्रेसर करणार : के पी पाटील

तरुणांसह महिलांसाठी रोजगार निर्मितीला प्राधान्य ;मतदारसंघ पर्यटन व इतर उद्योगातही अग्रेसर करणार : के पी पाटील

राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी मतदार संघाचा बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी येथील तरुण-तरुणींसह महिलांसाठी रोजगार निर्मितीवर आपला भर राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार के पी पाटील यांनी केले. 

या मतदार संघातील राधानगरी,भुदरगड व आजरा हे तिन्ही तालुके सर्वाधिक निसर्गसंपन्न असल्याने येथे पर्यटन व्यवसाय निर्मितीला चालना देण्याबरोबरच एमआयडीसीसह छोटे-मोठे औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यासाठीही आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे के पी पाटील यांनी सांगितले.

कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथे त्यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची मोठी पदयात्रा झाली. त्यानंतर झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते.

 पाटील पुढे म्हणाले,"गेल्या दहा वर्षांत या मतदारसंघात बेरोजगारीने कळस गाठला असून यावर मी केवळ भाष्य करून थांबणार नाही तर कोणत्याही परिस्थितीत एमआयडीसीच्या माध्यमातून विविध उद्योगधंदे सुरू करण्याला मी प्राधान्य देणार आहे. यामुळे तरुण-तरुणींच्या हाताला काम मिळेल. याशिवाय ज्या महिला गृहिणी आहेत त्यांनासुद्धा घरबसल्या काही रोजगाराच्या संधी देण्यासाठी माझे अभ्यासपूर्ण प्रयत्न राहतील. जागतिक दर्जा असलेले दाजीपूरचे अभयारण्य ही अभिमानाची बाब असून निसर्गाचे एवढे मोठे वैभव लाभलेले असतानाही हा मतदारसंघ पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याला मोठी संधी होती परंतु तो झाला नाही. यावर भाष्य करण्यापेक्षा मी तो पर्यटनाच्या बाबतीत जगाच्या नकाशावर ठळकपणे नेण्यासाठी नियोजनबद्ध काम करणार आहे. मुबलक पावसाचा प्रदेश असल्याने येथे धरणे व लघु पाटबंधारे प्रकल्पांची संख्या खूप मोठी आहे. अनेक धबधबे पाहण्यासारखे आहेत. त्यामुळे येथे वर्षा पर्यटनासाठी जगभरातील पर्यटक येथील अशी आखणी या मतदारसंघात मी करणार असून भुदरगड,रांगणा,शिवगड यासारख्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करून त्या माध्यमातूनही या मतदारसंघाची पर्यटन व्यवसायासाठी विशेष ओळख निर्माण करून त्यातूनही रोजगार निर्मितीला मी प्राधान्य देणार आहे." 

बिद्री साखर कारखान्याचे संचालक उमेश भोईटे म्हणाले,"संस्था कशा चालवायच्या हे के पी पाटील यांनी बिद्री साखर कारखाना, हुतात्मा वारके सूतगिरणी आणि कोल्हापूर बाजार समिती यांच्या कारभारातून सिद्ध केली आहे. सूतगिरणीच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला असून भविष्यात तेच रोजगार निर्मितीसाठी मतदारसंघात भरीव काम करू शकतात."

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले,वसंतराव पाटील, सचिन पाटील,शामराव भोई आदींची भाषणे झाली. फिरोजखान पाटील,भिकाजी एकल, महेश भोईटे,शरद पाडळकर,सुनील भोईटे, गणपती महेकर,विकास पाटील,भगवान पाटील, जयवंत खोत,डी जी पाटील,अशोक चौगले आदी उपस्थित होते.पालकरवाडी,चंद्रे,माजगाव, शेळेवाडी,चक्रेश्वरवाडी, बारडवाडी,जोगेवाडी,तळाशी येथेही प्रचार दौरा झाला.

 *..... तर मग दहा वर्षे काय करीत होता?* 

विद्यमान आमदार आबिटकर हे निवडणूक दोन दिवसांवर आली असताना आता मतदारसंघात एमआयडीसी उभा करण्याच्या बाता मारीत आहेत. प्रचारसभांमधून आम्ही या विषयावर आवाज उठविल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेले आमदार खडबडून जागे झाले असावेत. मतदार संघ बेरोजगारीने ग्रासला असतानाही तुम्ही दहा वर्षे काय करीत होता?असा प्रश्न के पी पाटील यांनी विचारताच सभासदांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजविल्या.