आगामी निवडणूकांसाठी मनसेने ‘एकला चलो रे’ चा मार्ग स्वीकारला

आगामी निवडणूकांसाठी मनसेने ‘एकला चलो रे’ चा मार्ग स्वीकारला

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे महापालिका निवडणुकीत स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच, मनसेने पुण्यात ‘एकला चलो रे’ चा मार्ग स्वीकारल्याचं स्पष्ट झालं आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील शहर कार्यालयात मनसेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे पुणे महानगरपालिकेतील सर्व जागांवर उमेदवार देण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 जून रोजी पुणे दौऱ्यावर येणार असून, शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत प्रमुख नियुक्त्या जाहीर होणार असून, संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होणार आहेत. पुण्यातील सर्व शाखाप्रमुख आणि गटप्रमुख बदलले जाणार असून, त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक नवे पद देखील निर्माण होणार आहे.