स्व. पी.एन.पाटील यांच्यामुळेच धामणी प्रकल्पाला गती मिळाली : राहुल पाटील

स्व. पी.एन.पाटील यांच्यामुळेच धामणी प्रकल्पाला गती मिळाली : राहुल पाटील

पणुत्रे (प्रतिनिधी) : निवडून येताच स्व.आम.पी. एन.पाटील यांनी पहिल्यांदा धामणीचे काम हाती घेतले होते. १० वर्षे रखडलेला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संबंधित मंत्र्यांशी बैठक घेऊन सातत्याने पाठपुरावा करून जुन्या ठेकेदाराचे देणे देऊन नवीन ३२५ कोटींचा निधी मंजूर करून आणला.स्व.पी.एन.पाटील यांच्यामुळेच धामणीच्या कामाला गती मिळाली, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार राहुल पी.एन.पाटील यांनी पणुत्रे (ता.पन्हाळा) येथील सभेत केले. 

   सभेच्या अध्यक्षस्थानी कृष्णात पाटील होते. राहुल पाटील यांनी धामणी खोऱ्यातील गावांचा प्रचार दौरा केला. राहुल पाटील यांचे गावातून वाजतगाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले. पणुत्रे येथील सभेत गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.  

   राहुल पाटील पुढे म्हणाले, धामणी प्रकल्पाचे काम पाहायला आज आपल्यात स्व. पी. एन. पाटील नाहीत.त्यांनी प्रत्येक गावात निधी दिला. ज्या आस्थेने साहेबांना आपण साथ दिली त्याच पद्धतीने मला साथ द्यावी. जि. प. अध्यक्ष म्हणून काम करताना राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना संपूर्ण जिल्हाभर राबविल्यामुळे माझ्या कारकिर्दीत जिल्हा परिषदेला अनेक पुरस्कार मिळाले.स्व.पी. एन. पाटील यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विधानसभेत पाठवा असे आवाहन केले. 

   गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले, विरोधी उमेदवार १० वर्षे आमदार होते, पण पत्रकबाजी सोडून त्यांना काही करता आले नाही. धामणी प्रकल्पावर मातीची एक पाटी यांच्या काळात पडली नाही. त्यांना विकासाचा डांगोरा पिटण्याचा अधिकार नाही, असा हल्ला चढविला. स्व. आम. पी.एन.पाटील यांनीच धामणीच्या कामाला गती दिली. त्याला साथ आम.आबिटकर यांची मिळाली. स्व. साहेबांनी आयुष्याची ४० वर्षे जनसेवेसाठी दिली आहेत. त्यांच्या पश्चात उरलेली दोन आठवडे त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्यासाठी देऊया आणि त्यांना आमदार करूया. 

   गोकुळचे संचालक डॉ.चेतन नरके, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, बाजार समितीचे माजी संचालक शशिकांत आडनाईक, शाहू काटकर, बाळासाहेब मोळे, जी.डी.भास्कर, हंबीरराव चौगले, विलास पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, बाजीराव पाटील, प्रल्हाद पाटील, अशोक पाटील यांचेसह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.