उद्या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन

उद्या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन
कोल्हापूरसह देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा शुभारंभ

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेतून उद्या दि. ६ ऑगस्ट रोजी कोल्हापूरसह देशातील नामांकित ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या पायाभरणीचा शुभारंभ होणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी ‘अमृत भारत स्टेशन’ योजना जाहीर केली आहे. या योजनेतून देशातील नामांकित ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या पायाभरणीचा शुभारंभ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये पुण्यातील १५ स्थानकांचा समावेश आहे. यासाठी रेल्वे बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. या स्थानकांचा पुनर्विकास झाल्यामुळे प्रवाशांना अनेक सुविधा मिळणार आहेत. स्थानकांच्या पुनर्विकासामध्ये प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून विश्रांतीकक्ष, शयनकक्ष, फूडप्लाझा, आरक्षण केंद्र, तिकीट घर, लिफ्ट, एस्कलेटर अशा अनेक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील तीन स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. तळेगाव स्थानकासाठी ४०.३ कोटी, कोल्हापूर स्थानकासाठी ४३ कोटी, आकुर्डी स्थानकासाठी ३३.८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, मंडल पदाधिकारी, आघाडी-मोर्चा संयोजक व पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.